संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण-डोंबिवलीत गेल्या चार दिवसाने पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून डोंबिवली पश्चिम येथील ‘सावित्रिदेवी बसप्पा हेबळी’ विद्यालयातील लसीकरण केंद्रावर ३२० जणांना लस देण्यात आल्याची माहिती भाजपचे मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी दिली. अनेक लाभार्थ्यांनी सदर लसीकरण केंद्राच्या शिस्तबद्ध व नियोजनबध्द कामाचे अभिप्राय नोंदवहीत नोंदवून कौतुक केले आहे, तर जेष्ठ नागरिकांनी सदर केंद्रातील लसीकरणाच्या नियोजनबद्ध आखणीबद्दल समाधान व्यक्त केले.
बुधवारी सकाळी १२.३० वाजता या केंद्रावर महापालिकेकडून लसीच्या कुप्यांचा पुरवठा करण्यात आला. त्यांनतर उत्तम नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने या सेंटरवर लसीकरण करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर अनेक नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू झाले असून सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे, मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस, मंडळ उपाध्यक्ष अमोल दामले, दिलीप धुरी, सुरेश जोशी, गीता नवले आदी कार्यकर्ते ही लसीकरणाची मोहीम राबवत आहेत. अनेक लाभार्थ्यांनी लस घेतल्यानंतर ताटकळत न ठेवता लसीकरण सेवा उपलब्ध करुन दिल्याने लसीकरण केंद्राबद्दल समाधान व्यक्त केले व लसीकरण नियोजन बध्द होत असल्याने नागरिकांनी अभिप्राय नोंदवही ठेवण्यासाठी आग्रह केला होता. या नोंदवहीत अनेकांनी या केंद्राच्या नियोजनाचे कौतुक केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने खोळंबा होऊ न देता लस पुरवठा पुर्ववत केल्याने भाजपा मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी महापालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी आणि पालिका अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.