
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
उद्या जर का ही ४५ कुटूंब अपघातात दुर्दैवी मृत्यू पावली तर त्याला सरकार जबाबदार.. ?
चुनाभट्टीतील टाटानगर परिसरातील गिरणी कामगारांची इमारत मालवणी इथल्या घटनेनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या १५ वर्षांपासून इथले रहिवाशी जीव मुठित घेवून राहत आहेत. दुसरा पर्याय नसल्यानं करायचं काय असा प्रश्न इथल्या रहिवाश्यांसमोर आहे. त्यामुळे हे रहिवासी याच अतिजीर्ण इमारतीत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.
स्वदेशी मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६० मध्ये ही तीन मजली इमारत बांधण्यात आली. त्यावेळी या ईमारतीमध्ये एकूण १२२ कुटुंब राहत होती. मुंबईतल्या गिरण्या हाळू हाळू बंद पडू लागल्या. त्यातच २००१ मध्ये स्वदेशी मिल ला देखील टाळे लागले. गिरणी बंद झाल्यानं या इमारतीकडे कंपनीने लक्ष्य देणं टाळलं. आणि काही वर्षातच या इमारतीची अवस्था अत्यंत दयणीय झाली. या ईमारतीला बाहेरून पाहिलं की आता मध्ये जाण्याची हिंमत होत नाही. बाल्कनीचे तुटलेले कठाडे , तुटलेलं सिलिंग या ईमारतीच्या दयनियतेची साक्ष देतात.
ज्या रहिवाश्यांकडे पैसे होते ते रहिवासी दुसरीकडं रहायला गेले. मात्र ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही असे रहिवासी जुण्याच ठिकाणी राहू लागले. या इमारतीमध्ये सध्या ४५ कुटुंब वास्तव्य करत आहेत. जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या इमारतीचे पिलर गंजले आहेत. पिलरमधून बाहेर येणाऱ्या गंजलेल्या सळ्या या इमारतीची दयनीय कहाणी सांगण्यास पुरेश्या आहेत. एखादा वयोवृद्ध व्यक्ती काठीचा आधार घेवून जसा उभा असतो तशीच ही ईमारत टेकूचा आधार घेवून उभी आहे. पावसाळ्यात जरी डोक्यावर छत असलं तरी छताच्या तुटक्या फटीतून पाऊस घरात प्रवेश करतोच. पावसाळा आला की इथल्या नागरिकांचे भय दुनावतं. वारा सुटला की काळजाचा ठोका चुकतो. पावसाळ्यात मनपा नोटीस देते पण पर्यायी राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत नाही असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.