संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
प्रतिवर्षी ‘१५ जून’ हा दिवस आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने यंदा विश्व मल्लखांब संघटनेच्या वतीने दोन महिने चालणाऱ्या साप्ताहिक ‘ऑनलाईन’ व्यायाम वर्गाचे उदघाटन करण्यात आले. सध्या कोरोनामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगात सगळीकडेच मैदानी सराव बंद आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत ‘मल्लखांब फेडरेशन यू. एस. ए. यांचेतर्फे न्यूयॉर्क येथे दुसऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी तीस देशांनी यापूर्वीच त्यांच्या सहभागाबाबत लेखी कळविले आहे.
सर्व देशातील मल्लखांबपटूंना प्रत्यक्ष मल्लखांब सराव सुरु करण्यापूर्वी घरच्या घरी, कोणत्याही साधन-सामुग्रीशिवाय कोणते कोणते व्यायाम करता येतील, शरीरतापनाचे सूक्ष्म व्यायाम, शरीराची लवचिकता वाढविणारी योगासने, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविणारे प्राणायामाचे प्रकार, अष्टांग प्रणिपातासन सूर्यनमस्कार, ताकद व दम वाढविण्यासाठी साधनविरहित व्यायाम याचे विनामूल्य ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण व मार्गदर्शन विश्व मल्लखांब संघटनेच्या वतीने छत्रपती, दादोजी कोंडदेव व जीवन गौरव पुरस्कार विजेते उदय देशपांडे व त्यांचे सहकारी यांनी पाचव्या आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या निमित्ताने सुरु केले. या प्रसंगी विश्व मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार अॅडव्होकेट व श्री. महेंद्र चेम्बुरकर, श्री. श्रेयस म्हसकर, डॉ. नीता ताटके हे संचालक हजर होते. कलिना पावेल (झेक रिपब्लिक), विवेक साबळे (जपान), फिलिपा फ्रिस्बी (यू. के.), नेव्हल फर्नांडिस (जर्मनी), प्रवर ओभान (नेदरलँड्स), कमला देवी (मलेशिया), निमेश देसाई (ऑस्ट्रेलिया), हँसन यिप (सिंगापूर), डॉमनिक बेकर (फ्रान्स) तसेच भारतातील उत्तराखंड, पुणे, मुंबई येथील राष्ट्रीय प्रशिक्षक अशा एकूण तीस जणांनी पहिल्या सत्राला हजेरी लावली. श्री. उदय देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले व कोरोनानी आपल्यातून ओढून नेलेल्या ‘मल्लखांबाचा अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. दत्ताराम दुदम यांना श्रद्धांजली वाहून सत्राला सुरुवात केली. दि. १४ ऑगस्ट २१ पर्यंत दर शनिवारी भारतीय वेळेप्रमाणे सायंकाळी ६ ते ६.३० या वेळात चालणाऱ्या या विनामूल्य कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला विश्व मल्लखांब संघटनेतर्फे ‘ई सहभाग प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे.
संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाचवा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन उत्साहाने सजरा करण्यात आला. मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेतर्फे ‘मल्लखांब किंग’ दत्ताराम दुदम यांना हा दिवस समर्पित करण्यात आला होता. ओळीने ११ वर्षे जिल्हा अजिंक्यपद, आठ वर्षे राज्य अजिंक्यपद व सहा वर्षे राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावणारा ‘अजिंक्यतारा’ म्हणून दत्ताराम संपूर्ण भारतात ओळखला जातो. १९८७ साली भारत सरकारतर्फे रशिया येथे गेलेल्या प्रदर्शनीय संघातून मॉस्को, लेनिनग्राड व कीव या ठिकाणी त्याने उत्कृष्ट मल्लखांब प्रदर्शन करून रशियन लोकांची मने जिंकली होती. गेल्या जून मध्ये घेतलेली त्याची मुलाखत ‘मल्लखांब कट्टा’ या ‘यू ट्यूब चॅनलवर’ या निमित्ताने पुनर्प्रसारित करण्यात आली. कै. दत्ताराम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या समर्पित जीवनावरील सुंदर लघुध्वनिचित्रफीत प्रकाशित केली. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षांतील स्पर्धांमध्ये मल्लखांबवर एखादा नवीन क्रीडा प्रकार सर्वप्रथम सादर करणाऱ्या मल्लखांबपटूंच्या मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. खासदार, आमदार, मंत्री महोदयांपासून अगदी नगरसेवकांपर्यंत विविध राजकीय नेत्यांनी व अभिनेत्यांनीही सोशल मिडियावरून मल्लखांबपटूंना जागतिक मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा दिल्या. चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, वृक्षारोपण असेही उपक्रम बऱ्याच संस्थानी राबविले. भारतीय मल्लखांब महासंघाच्या वतीने तामिळनाडू येथील बुजुर्ग मल्लखांब प्रशिक्षक श्री. उलगा दुराई यांना ‘उत्कृष्ट मल्लखांब प्रशिक्षक’ पुरस्कार तसेच दत्ताराम दुदम यांना ‘किंग ऑफ मल्लखांब’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.