संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.
इयत्ता १० वीच्या गुणांना ३० टक्के भारांश
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.
इयत्ता अकरावी ३० टक्के भारांश
इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण
इयत्ता बारावीसाठी ४० टक्के भारांश
बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.
बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.
बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.
बारावी निकालाचा फॉर्म्युला सविस्तर वाचण्यासाठी शासन निर्णय वाचा, शासन निर्णय वाचण्यासाठी क्लिक करा
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द
सन २०२१-२१ या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक 202106111 720454121 असा आहे.