
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रात्री ‘ऑल आऊट’ मोहीम राबवून शहरातील २५२ ठिकाणी कारवाई केली. यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ९९ जणांना अटक करण्यात आली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३५ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त केली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब बसविली. कारवाईत पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, १३ परिमंडळांचे उपायुक्त, विभागीय साहाय्यक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार सहभागी झाले होते.
रात्री ११ ते पहाटे २ पर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी अभिलेखावरील १ हजार ३६ आरोपींची तपासणी केली. त्यामध्ये ३८३ जण सापडले. अजामीनपात्र गुन्ह्यातील १०२ आरोपींना अटक केली. अवैध धंद्यावर ४३ ठिकाणी छापे घालण्यात आले. या अवैध धंद्यात गुंतलेल्या ६९ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी संवेदनशील अशा ४९९ ठिकाणी तपासणी केली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी ८१५ हॉटले आणि लॉजची पाहणी करण्यात आली.
पोलिसांनी शहरात एकाचवेळी २०१ ठिकाणी नाकाबंदी केली होती. ७,३४७ वाहनांची तपासणी करून मोटारवाहन कायद्यान्वये १,७५९ वाहन चालकांवर कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ७५ जणांविरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.