
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झाल्या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर अडचणीत आले आहेत. गुन्हेगारास केकचा तुकडा भरवतानाची चित्रफीत समाजमाध्यमांतून प्रसारित होताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत नेर्लेकर यांची बदली विभागीय नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
याआधी भांडुप पोलीस ठाण्यात असाच एक प्रसंग घडला होता. दानिश शेख असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, दंगल, मारहाण आदी गुन्हे दाखल आहेत. तो वास्तव्याला असलेल्या इमारतीच्या कार्यालयात त्याचा वाढदिवस साजरा झाला. या सोहळ्यास नेर्लेकर उपस्थित होते. इतकेच नव्हे तर त्यांनी केकचा तुकडा दानिशला भरवल्याचे चित्रफितीत दिसते. दोन आठवड्यांनी ही चित्रफीत व्हायरल झाली व त्यावरून पोलीस दलावर टीका सुरू झाली.
ही बाब लक्षात येताच आयुक्तालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. साकिनाका विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या माहितीस पोलीस उपायुक्त डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला. चौकशी पूर्ण होईपर्यंत नेर्लेकर यांच्याकडून जोगेश्वरी पोलीस ठाण्याची जबाबदारी तात्पुरत्या स्वरुपात काढून घेण्यात आली आहे आणि त्यांना पश्चिम प्रादेशिक विभागात हलविण्यात आले आहे, असे रेड्डी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
टीकेवर नेर्लेकर यांचे उत्तर..
दरम्यान ही चित्रफीत जुनी आहे, असे नेर्लेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. इमारतीत महापालिके कडून पाडकाम सुरू होते, त्यासाठी तेथे गेलो होतो. असे उत्तर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे.