संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत
कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस गरजेचा आहे का? असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. कोरोना व्हायरसचे म्युटेट होणारे नवीन व्हेरियंट पाहता, देशभरातील तज्ज्ञांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसची गरज असल्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॅा. शशांक जोशी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “बूस्टर डोसबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. यावर सद्यस्थितीत भाष्य करणं योग्य होणार नाही.” तर केंद्राने राज्यसभेत तज्ज्ञांच्या समितीने बूस्टर डोसबाबत अद्याप कोणतीही शिफारश केलेली नाही, अशी माहिती दिलीये.
तज्ज्ञ म्हणतात, लशीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या डोसला ‘बूस्टर डोस’ असं म्हटलं जातं. आता सामान्यांना प्रश्न पडेल की, बूस्टर डोस म्हणून देण्यात येणारी लस, आम्ही आधी घेतलेल्या कंपनीची असेल का पूर्णत नवीन? याबाबत आम्ही लसीकरण आणि पब्लिक पॉलिसीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांच्याशी संपर्क केला. ते म्हणतात, “बूस्टर डोस म्हणजे काही वेगळी लस देण्यात येत नाही. शक्यतो एखाद्या व्यक्तीने याआधी जी लस घेतली असेल, तीच लस दिली जाते.”
“पण कोरोनाविरोधात विविध लशी उपलब्ध असल्याने, दुसर्या कंपनीचा बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.” लशीमुळे व्हायरस आणि बॅक्टेरियाविरोधात लढण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसीकरणतज्ज्ञ म्हणतात, आजाराविरोधात लढण्यासाठी गरजेच्या अन्टीबॉडीजची संख्या वाढवण्यासाठी, बूस्टर डोस महत्त्वाचा असतो.
जगभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी विविध लशी निर्माण करण्यात आल्या आहेत. या लशी म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 च्या नवीन व्हेरियंटविरोधात प्रभावी आहेत का? यावर लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून संशोधन सुरू आहे. डॉ. लहारिया पुढे सांगतात, “कोरोना संसर्गानंतर आणि कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अन्टीबॉडीज नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ रहातात, असे पुरावे संशोधनात मिळाले आहेत.”
लशीचा डोस घेतल्यानंतर कालांतराने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे बूस्टर डोसची गरज भासू शकते, असा तर्क लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून दिला जातोय. “शरीरात तयार होणाऱ्या अन्टीबॅाडीज आणि आजारापासून मिळणारी सुरक्षा यांचा थेट संबंध स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे, याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे,” असं ते पुढे म्हणाले. कोरोना व्हायरस दिवसेंदिवस आपलं रूप बदलतोय. जगभरात थैमान घालणारा डेल्टा व्हेरियंट, डेल्टा प्लस, लांब्डा, कप्पा असे अनेक व्हेरियंट तयार झालेत. त्यामुळे कोरोनाविरोधात बूस्टर डोसची गरज असल्याची चर्चा सुरू झाली.