संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा व संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी त्यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत करोना लसीकरणाबाबत बोलताना आज केंद्र सरकारच्या लस निर्यात धोरणावर कडकडून टीका केली. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लसीकरण, लॉकडाउन व केंद्र सरकारच्या धोरणावर रोखठोक मतं मांडत त्यांनी केंद्र सरकारच्या लस निर्यातबंदीच्या धोरणावर त्यांनी बेधडक टीका केली. ‘माझा मुलगा म्हणाला होता की यावर बोलू नका, पण मी बोलणार,’ असं ते यावेळी म्हणाले.
‘केंद्र सरकारनं लस निर्यातीवर घातलेली बंदी योग्य नाही. मोदी सरकारनं हा निर्णय घेऊन अतिशय वाईट केलं. माझ्या मुलानं सांगितलं होतं की त्यावर तुम्ही तोंड उघडू नका. पण माझं मत आहे की निर्यातबंदी उठवली पाहिजे. कारण, बाकीच्या देशातील नागरिकांना देखील लसीची गरज आहे. सीरम इन्स्टिट्यूट आजवर जगातील १७० देशांना लस पुरवत आली आहे. पण आता गरज असताना आम्ही त्यांना लस पुरवू शकत नाही अशी स्थिती आहे. त्यांच्याकडून अॅडव्हान्स पैसेही घेतले आहेत. ‘बिल गेट्स फाउंडेशन’कडून मी ५ हजार कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, त्यांना लस पुरवता येत नाहीए,’ असं पूनावाला म्हणाले.
लसीकरण पूर्ण करण्याच्या टार्गेटवरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘आम्ही वर्षाला ११० कोटी लसीकरणाचं लक्ष्य ठेवलं आहे. याचा अर्थ महिन्याला सुमारे १० कोटी डोसेसचं उत्पादन करावं लागणार आहे. ही काही सोपी गोष्ट नाही. जगातली कुठलीही कंपनी इतकं उत्पादन करू शकत नाही. पण तिकडं केंद्र सरकार वर्षाअखेरीस लसीकरण पूर्ण करण्याचं आश्वासन देत आहे. त्यांनी थापा मारणं बंद करावं. त्यांनी सांगितलेल्या मुदतीत लसीकरण शक्य नाही,’ असं परखड मत त्यांनी मांडलं.
मृत्यू दर वाढला तरचं लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा !
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरसकट लॉकडाउनचा वापर करण्यासही सायरस पूनावाला यांनी विरोध दर्शवला. ‘लॉकडाउन लावणे योग्य नाही. सरकारनं लॉकडाउन लावूच नये. ‘कोरोना मृत्युदर खूपच कमी आहे. कोरोनातील बरेच मृत्यू हे निष्काळजीपणामुळे झाले आहेत. लोक वेळीच उपचार घेण्यासाठी गेले नाहीत, अशी अनेक कारणं आहेत. मृत्यू दर वाढत असतील, तरच लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा,’ असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला.