संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. मात्र पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला. अखेर नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली असून त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात जामीन अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे.
नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे