Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तैयारी सुरू! एकेरी प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे पत्ते होणार कट?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई: कोरोना महामारीमुळे राज्यातील वसई-विरार सारख्या अनेक महानगरपालिकेची मुदत संपली असून देखील निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह 18 महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्याची तयारी आता राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या महानगरपालिकांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना हे पत्र पाठवले आहे यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.

या सर्व महापालिकांची लोकसंख्या आणि व्यापकता लक्षात घेता निवडणुका वेळेवर घेण्यासाठी आत्तापासूनच नव्याने प्रभाग रचना करणे आवश्यक असल्याच्या निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना आहेत.

राज्य सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्य प्रभाग पद्धत लागू केली आहे त्यामुळे राज्यात यापुढे पॅनेल पद्धती बंद होणार असून प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असणार आहे. यापूर्वी काही महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात किमान ३ तर काही महानगरपालिकांमध्ये ४ सदस्य होते.

भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्यातील महानगरपालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने म्हणजेच पॅनेल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचा भाजपला फायदा देखील झाला होता. मात्र आता आघाडी सरकारने एक सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात राजकीय पक्षांची त्यातही विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

बहुसदस्यीय प्रभाग रचना संपुष्टात आल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असून एकाच प्रभागात अनेकांची दावेदारी केली जाणार असल्यामुळे सगळ्याच नगरसेवकांना तिकीट देऊन समाधान करणे शक्य नसल्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्याचे एक मोठे आव्हान राजकीय पक्षांसाठी ठरणार आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांची महाविकास आघाडी झाल्यानंतर पहिल्यांदाच महत्त्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. यात ३ पक्षांचं आघाडी सरकार तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच जनतेकडून काय कौल येतो? तो या ३ पक्षांच्या बाजूने असेल की भाजपाच्या बाजूने? हे दिसून येणार आहे.

एकीकडे काँग्रेसने स्वबळावर महानगरपालिका निवडणुका लढवण्याचं ठरवले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

शिवसेनेने देखील एकाला चलो रे ची भूमिका कायम ठेवल्याने ते या निर्णयावर शेवटपर्यंत कायम राहतात का? आणि यानंतर काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किती यश मिळतं हे देखील स्पष्ट होणार आहे. तर भाजपची एकाकी लढत त्यांना किती यश मिळवून देईल हे देखील स्पष्ट होणार असून येणाऱ्या काळात जनतेचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने असेल हे देखील स्पष्ट होणार आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *