संपादक: मोईन सैय्यद/प्रतिनिधी: गणेश नवगरे
मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांवर करोना चाचणीची किंवा लसीकरणाची अट घालण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्यातरी अशा अटी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत याबाबत तोडगा काढण्याचे सूतोवाच रविवारी केले. त्यामुळे दोन्ही जिल्हाधीका-यांच्या निर्णयामधे बदल केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रवेश करण्याच्या ७२ तास आधी करोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्याचा किंवा दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच कोकणात प्रवेश देण्याचा निर्णय येथील जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच घेतला. परंतु त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
त्यामुळे याप्रकरणी आरोग्यमंत्री टोपे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ”लसीकरण कमी असल्याने दोन लसमात्रा घेतलेल्यांना कोकणात प्रवेश किंवा करोना चाचणी बंधनकारक करणे सध्यातरी शक्य नाही. परंतु याबाबत दोन ते तीन दिवसांत तोडगा काढला जाईल”, अशी माहिती टोपे यांनी दिली.
करोनाची लक्षणे वगैरे असतील, तर चाचणी करणे योग्य आहे. दोन लसमात्रा घेतलेल्यांचे प्रमाणही कमीच आहे. त्यामुळे शारीरिक अंतर ठेवणे आणि मास्क बंधनकारक करणे हे नियम योग्य आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. सध्या सिंधुदुर्गात करोनाबाधितांचे प्रमाण ३.२४ टक्के आणि रत्नागिरीत २.६५ टक्के आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या स्पष्टीकरणानतर बहुधा उद्याच जिल्हाधिका-यांनी दिलेल्या निर्णयात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.