Latest News गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

गाडीला कट मारल्याच्या शुल्लक कारणावरून १८ वार्षीय मुलावर हल्ला करून केले ठार!
लाल रंगाचा टीशर्ट घातल्यामुळे झाला हल्ला?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

मिरारोड: सिल्व्हर पार्कमधील एका १८ वर्षीय मुलाची गाडीला ओव्हरटेक करुन कट मारल्याचा शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली या मारहाणीत हटकेश परिसरात सिल्व्हर सरिता येथे राहणारा शुभम शांताराम भुवड नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी नऊ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काशिमीरा परिसरात आरोपी दुचाकीवरुन जात असताना एका लाल टी-शर्ट घातलेल्या मुलाने त्यांना ओव्हरटेक करून मागे टाकले. त्याने आरोपीच्या बाईकला खूप जवळून कट मारली ज्यामुळे दुचाकीस्वार चिडले. त्यांनी त्या लाल टीशर्ट घातलेल्या मुलाला शोधायला सुरुवात केली.

हटकेश परिसरात लवकरच त्यांना लाल टीशर्टमध्ये दुचाकीस्वार दिसला. त्या नंतर ९ जणांच्या गटाने त्याला पकडून त्याच्यावर निर्घृण हल्ला केला. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून निघून. त्यानंतर त्या मुलाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

काशिमीरा पोलिसांनी विनोद उपाध्याय(४४),  आकाश हिरवे(२५), कुणाल किणी(३३), सनी उपाध्याय(२५), वसीम अल्ताफ शेख(३२), राजू इर्शाद शेख(३२), सायस मुंढे(१९), जतीन उपाध्याय(२१) या आठ जणांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर रवी पुजारी नावाचा आरोपी सद्ध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

आरोपी पैकी काहीजण हे घोडबंदर परिसरातील असून वाळू माफिया असल्याचे बोलले जात आहे. त्यांचेवर बेकायदेशीर वाळू उपसा केल्याचे अनेक गुन्हे देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम भुवडवर झालेला हल्ला हा लाल रंगाच्या टीशर्ट घातल्याने  चुकीची ओळख झाल्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. ज्या मुलाने आरोपींच्या
मोटारसायकलला वेगाने ओव्हरटेक करून अगदी जवळून कट मारली त्याने लाल रंगाचा टीशर्ट घातलेला होता, आरोपी त्या लाल रंगाचा टीशर्ट घातलेल्या व्यक्तीला हटकेश परिसरात शोधत असताना त्या दिवशी शुभम भुवड ह्याने देखील लाल टीशर्ट घातलेला होता.

शुभम आपल्या मित्रा सोबत फॉरचून हाईट्स या इमारतीसमोर आपल्या मित्रासोबत बोलत उभा होता. आपल्या गाडीला कट मारणारा लाल रंगाचा टीशर्ट घातलेला हाच मुलगा आहे असा समज झाल्यामुळे आरोपींच्या टोळक्याने शुभमवर प्राणघातक हल्ला करून ठार केले.

शुभम भुवड नावाच्या मुलावर हल्ला नक्की गफलतीत झाला? की हा हल्ला पूर्वनियोजित ठरवून करण्यात आला? याचा पुढील तपास काशीमीरा पोलीस करीत असून शुभम भुवड नावाच्या १८ वार्षीय मुलाच्या हत्येचे नेमके कारण लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *