संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा, भाजप आमदार नितेश यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा वाद रंगला आहे. त्यात लुकआऊट नोटीसची आता भर पडली आहे.
आमदार नितेश राणे आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांनी ‘डीएचएफएल’ कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील २५ कोटी रकमेची परतफेड झाली नाही. त्यामुळे ‘डीएचएफएल’ कंपनीने राणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. राणे कुटुंबाने ‘डीएचएफएल’ कंपनीकडून ‘आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’साठी कर्ज घेतलं होतं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे हे सहअर्जदार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे हे कर्ज खातं हे मुंबईचं आहे. मग पुणे पोलिसांनी कारवाई कशी केली? असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान, ‘डीएचएफएल’ने तक्रार दिली होती. त्यामुळे राहिलेलं कर्ज न देता राणे कुटुंब परदेशात पळून जाऊ शकतं, त्यामुळे हे लूकआऊट नोटीस देण्यात आल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.
याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, केंद्र सरकारकडून एक पत्र गृह विभागाला प्राप्त झालं होतं. त्यानंतर ते पत्र आम्ही पुणे पोलिसांना पुढील कार्यवाहीसाठी दिले.
दुसरीकडे राणे कुटुंबीयांना लुकआऊट नोटीस दिली असेल तर केवळ राजकीय सुडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करतंय. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली तसेच हे राज्य सरकारचं पुढचं पाऊल आहे असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.
आम्ही हायकोर्टात आव्हान देणार : नितेश राणे
दरम्यान, यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे ‘डीएचएफएल’चे खाते मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापूर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुळे अशा नोटिसीचा उपयोग नाही. याप्रकरणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचच्या अडचणीत वाढ होणार आणि महाविकास आघाडीची अडचण होणार आहे.
हे सर्क्यूलर कुणी काढलं असेल यावर बोलतांना नितेश राणे म्हणाले, सर्क्यूलर कुणी काढलं हे या ठाकरे सरकारला विचारा. यांची झोप आम्ही उडवत आहोत. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार आहेत. त्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात कळेलच. तसेच लुकआउट नोटिस संदर्भात आम्ही हायकोर्टात बोलू.