फ्लुच्या संसर्गाचा धोका वाढतोय…
संसर्ग टाळण्यासाठी सहा महिन्यावरील प्रत्येकाने फ्लु शॉट्स घेणं गरजेचं – डॉक्टर
संपादक : मोईन सय्यद /मुंबई प्रतिनिधी गणेश नवगरे
पुणे: इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनला ‘सिझनल फ्लू’ म्हटले जाते. या ‘फ्लू’ पासून संरक्षण करण्यासाठी लस उपलब्ध असून त्याला फ्लू शॉट्स असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लू’पासून बचावासाठी ही लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. ‘फ्लू’ विरोधातील लसीमुळे ‘इन्फ्लूएन्झा’ व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात म्हणून वेळीच फ्लू ची लस घेऊन त्यास प्रतिबंध करण्याचे आवाहन तज्ञ डाँक्टरांनी केले आहे. ताप, अंग दुखणे किंवा इंजेक्शन घेतलेल्या जागेवर सूज येणे यासारख्या दुष्परिणामांमुळे फ्लू शॉट्स घेण्यापासून स्वतःला थांबवू नका कारण ते दुष्परिणाम एक ते दोन दिवसात निघून जातात.
पुण्याच्या अपोलो क्लिनिकचे जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी म्हणाले की, फ्लू तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि दम्यासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. फ्लूची लस मिळाल्याने आजाराची गंभीरता कमी होईल आणि फ्लूशी संबंधित हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका देखील कमी होईल. फ्लू लसीकरण तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना गंभीर गुंतागुंतीपासून वाचवू शकते. निरोगी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते ज्यामुळे न्युमोनिया होतो. जर तुम्हाला आधीच फ्लू असेल तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते आणि तुम्हाला कोविड संसर्गास बळी पाडते.
डॉ.बुधवानी पुढे म्हणाले की, फ्लू लस घेतल्याने सह-संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. कारण, फ्लू आणि कोविड -१९ दोन्ही एकाच वेळी होण्याची शक्यता अधिक आहे. जरी ते दोन्ही सांसर्गिक श्वसनाचे आजार असले तरी वेगवेगळे विषाणू त्यांना कारणीभूत ठरतात आणि तुम्ही कितीही निरोगी असलात तरी फ्लू आणि कोविड -१९ च्या लसीकरणानंतर इंजेक्शन साइटवर वेदना आणि सूज, अंगदुखी, ताप येणे,थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून येतात. दुष्परिणामांच्या भीतीमुळे लस घेणे टाळू नका. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लूचे रुग्ण अधिक आहेत. या वर्षात ५,००० हून अधिक फ्लूचे रुग्ण दिसले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना याचा जास्त धोका असतो.
पुण्यातील अपोलो डायग्नोस्टीकचे डॉ. कीर्ती कोटला म्हणाले की, ज्या रुग्णांमध्ये –हदयविकाराच्या समस्या आहेत अशा रुग्णांमधील –हदविकाराचा धोका कमी करण्यासाठी फ्लू शॉट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या रुग्णामध्ये फुफ्फुसाचा आजार जसे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) बिघडण्याचा धोका कमी होतो. अशाप्रकारे सहा महिने आणि त्याहून अधिक वयाचा कोणीही फ्लू शॉट घेऊ शकतो. तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि नंतर लस घ्या