Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

वाहतूक शाखेची नवीन ‘इ -चलान’ दंड प्रणाली करता जनजागृती व्हावी म्हणून ‘नो चलान डे”.. 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोटार वाहन रेग्युलेशन २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली, सदर कायद्यातील अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने १ डिसेंबर २०२१ पासून राज्यभर सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये “१ स्टेट १ चलान” या योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०१९ पासून लेखी चलान बंद होऊन ई-चलान सुरु करण्यात आले आहे.

‘ई-चलान’ मशीन मध्ये नवीन दंड प्रणाली दिनांक १२/१२/२०२१ पासून सुरु करण्यात आली असून ठाणे आयुक्तालयातील कार्यान्वित असलेल्या सर्व ई-चलान मशिन्स वाढीव दंडप्रणाली प्रमाणे अद्ययावत करण्यात आली आहेत.

वाढीव दंडाचा फटका वाहन चालकांना बसण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, आपल्या वाहनांचे अपूर्ण कागदपत्र पूर्ण करण्यासाठी तसेच भविष्यात मोटार वाहन कायद्यान्वये कोणताही दंड वाहनचालकावर आकाराला जाऊ नये या उद्देशाने ३० डिसेंबर २०२१ हा एक दिवस “नो चलान डे” म्हणून आयोजित केला आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना समुपदेशन करण्यासाठी व सुधारणा करण्याची एक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. ३०/१२/२०२१ रोजी दिवसभर ठाणे आयुक्तालयातील कोणत्याही क्षेत्रामध्ये वाहतूक संदर्भातील चलान केले जाणार नाही तसेच प्रत्येक वाहतूक चौकीच्या व महत्वाच्या ठिकाणी नवीन वाहतूक नियमांसंदर्भातील वाढीव दंडाच्या तरतुदीबाबत व सुरक्षिततेच्या योजनेबाबत कसूरदार वाहनचालकांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी वाहतूक चौकीच्या व महत्वाच्या ठिकाणी जाऊन नवीन दंड प्रणाली जाणून घेण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. श्री. बाळासाहेब पाटील यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, या दिवशी जे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशा १० ते १५ वाहन चालकांचे गट तयार करून त्यांना महत्वाच्या ठिकाणी नेऊन त्यांचे वाहतूक नियमांसंदर्भात १५ ते २० मिनिटे समुपदेशन करण्यात येईल, त्यांच्या वाहनांची कागदपत्रे तपासून अपूर्ण कागदपत्रांची  जाणीव करून देण्यात येईल तसेच प्रलंबित चलान असल्यास त्याची माहिती करून देण्यात येईल. “नो चलान डे” जरी असला तरी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *