संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पूर्व येथील भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या मनोज कटके नामक पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ला झाल्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपाने डोंबिवलीत रामनगर येथील पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन व लाक्षणिक उपोषण केले. मात्र हल्लेखोरांना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात २८ तारखेला भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी मनोज कटके यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या घटनेला १५ दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपींना अध्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हल्ला झालेल्या भाजपा पदाधिकारी मनोज कटके याची भेट घेतली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र त्यांनतर या प्रकरणाचा तपास पुढे गेला नसल्याने आम्ही संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने उपोषण करत असल्याचेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
याच दरम्यान भाजपाने दिलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पोलिस ठाण्याबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या परिसरात उपोषणाला बसण्यास परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला. त्यामूळे पोलीस ठाण्याबाहेर असणाऱ्या पादचारी पथावर भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडत लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. मात्र एसीपी यांनी आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आपण हे आंदोलन तूर्तास मागे घेतल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.