संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी
मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील उत्तन परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या पालकां सोबत पिकनिकसाठी गेलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी ज्या बंगल्याच्या स्विमिंग पुलमध्ये मुलगी पडली तिथे जीव रक्षक तैनात न केल्या बद्दल त्या बंगल्याच्या मालकावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिमे कडील उत्तन हा निसर्गरम्य परिसर असून त्याठिकाणी अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. अशाच प्रकारे शुक्रवारी आयसीसीआय बँकेत काम करणारे कुटुंब पिकनिकसाठी उत्तनच्या ऑन द रॉक्स या बंगल्यात थांबले होते.
सकाळी १०.३० च्या सुमारास मुलीचे आई वडील नास्ता करण्यासाठी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर गेले असता त्याच वेळी सहा वर्षाची चिमुकली आणि सहा वर्षाचा मुलगा हे दोघे खाली स्विमिंग पुल जवळ आले. त्याच वेळी सहा वर्षाची चिमुकली स्विमिंग पुल मध्ये पडली. तिच्या सोबत असलेल्या मुलाने आरडाओरडा केली असता पहिल्या मजल्यावर असलेल्या एका महिलेने पाहिले आणि तिने धावत खाली येऊन मुलीला स्विमिंग पूल मधून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले असता तिचा रुग्णालयात आणण्याच्या आधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले.
या प्रकारणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अशी माहिती उत्तन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लहांगी यांनी दिली.
मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ज्या वेळी उत्तन येथील अनेक बंगल्यावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात त्यावेळी ज्या बंगल्यात स्विमिंग पुल आहेत त्या ठिकाणी जीव रक्षक म्हणजेच लाईफ गार्ड तैनात ठेवणे बंधनकारक असते. परंतु उत्तन परिसरातील अनेक बंगल्यात स्विमिंग पूल तर आहेत परंतु त्या स्विमिंग पुलावर लक्ष देण्यासाठी बंगल्याचे मालक पैसे वाचविण्यासाठी जीव रक्षक किंवा लाईफगार्ड तैनात करीत नाहीत. अनेक बंगल्यात आगी पासून सुरक्षा करणारी यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात देखील अश्या प्रकाराची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याच बरोबर उत्तन परिसरात सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक अनधिकृत बांधकामे करून त्याचा वापर परस्पर खाजगी बंगले, हॉटेल, रिसॉर्ट भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय बेकायदेशररित्या केला जात आहे व त्यामुळे महापालिका प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल देखील बुडवला जात आहे. असे असून देखिल महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेच महापालिके कडून या सर्व अनधिकृत बंगल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही असा आरोप केला जात आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईंदर विभाग या कार्यक्षेत्र असलेल्या उत्तन परिसरात असलेल्या या अनधिकृत बंगल्यात वेश्यावसाय, रेव्ह पार्ट्या, जुगार असे अनेक प्रकारचे अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे आरोप-तक्रारी अनेक वेळा केल्या असून देखील पोलीस प्रशासन मात्र याकडे ‘अर्थपूर्ण’ रित्या दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप केले जात आहेत.
गुढपाडव्याच्या पूर्व संध्येला एका कुटंबातील सहा वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमावावा लागला आणि त्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास करून संबंधित बंगल्याच्या मालकांवर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे जेणेकरून भविष्यात अश्या घटना पुन्हा घडू नयेत.