Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला ३०० किलोचा मृत डॉल्फिन

मिरा भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर अंदाजे २५० ते ३०० किलो वजनाचा जवळपास साडेसात फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. कांदळवन विभागाने मृत डॉल्फिनची रीतसर नोंद घेऊन मंगळवारी दुपारी समुद्र किनाऱ्यावरच त्याचे दफन केले.

उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिर जवळील समुद्र किनारी मृतावस्थेतील डॉल्फिन मासा सोमवारी आढळून आल्याची माहिती उत्तन सागरी पोलिसांना मिळाली. सदर मासा कुजलेल्या अवस्थेत होता. शासनाच्या कांदळवन विभागास याची माहिती मिळाल्या नंतर मंगळवारी वनक्षेत्रपाल चेतना शिंदे, वनपाल सचिन मोरे सह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत डॉल्फिनचा पंचनामा करून किनाऱ्यावरच जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात त्याचे दफन करण्यात आले आहे.

सदर डॉल्फिन हा साडे सात फूट लांब व सुमारे २५० ते ३०० किलो वजनाचा असल्याचे वन विभागाने सांगितले. डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी अंदाधुंद वाढत असलेले शहरी कारण त्यामुळे वाढते जल प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्यामुळेच समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे त्यामुळेच कदाचित हा डॉल्फिन मृत्यु पावला असावा आणि लाटांनी त्याचा मृतदेह किनारी लागल्याचे सांगण्यात आले.

भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यासह भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क कोळीवाडा व पश्चिम धक्का येथे देखील गेल्या काही काळात अनेक डॉल्फिन मासे अशा प्रकारे मृतावस्थेत सापडले आहेत. उत्तन समुद्रात तसेच भाईंदरच्या खाडीत देखील डॉल्फिनचा वावर असलेला अनेक वेळा पाहायला मिळतो. या ठिकाणी अनेक वेळा डॉल्फिन दिसून आले आहेत. तर समुद्र किनारी व खाडीतील पाण्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे मत्स्य पैदास प्रचंड कमी झाली असून जलप्रदूषण हे भाईंदर मधील डॉल्फिन माश्यांच्या मृत्यूचे मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *