संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलीसांकडून अटी आणि शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. त्यामुळेच या सभेवर पोलीसांची बारकाईने नजर होती. या सभेत राज ठाकरेंकडून नियम आणि अटींचं उल्लंघन केलं गेलं आहे का? या संदर्भात औरंगाबाद पोलीसांनी एक अहवाल तयार करून तो पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंवरील कारवाई बाबत चर्चा झाल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना मिळत आहे.
प्रसिद्धी माध्यमांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात दुपारी एक बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. त्यानुसार आता औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात निश्चित कारवाई होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी याच संदर्भात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या झालेल्या या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज ठाकरे यांच्यावर या कलमांतर्गत गुन्हा दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एफआयआरमध्ये राज ठाकरेंना आरोपी नंबर १ करत त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये औरंगाबाद येथील सभेमधील चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक कलमं लावण्यात आली आहेत.
अटींचं उल्लंघन
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधल्या सभेसाठी पोलीसांनी १६ अटी ठेवल्या होत्या. त्यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवली असा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
लावण्यात आलेले कलम –
राज ठाकरे यांच्यावर कलम ११६, ११७, १५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोणत्या कलमात कोणते गुन्हे ?
११६ – गुन्हा करण्यासाठी मदत करणे
११७ – गुन्ह्याला मदत करणे आणि चिथावणीखोर भाषण करणे
१३५ – अटि शर्थींचा भंग करणे
१५३ – दोन समूहात भांडण लावणे
सरकारचा पोलिसांवर दबाव ?
सरकारचा पोलीसांवर दबाव असल्याने राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. सभेसाठी मुद्दामच पाळता न येण्यासारख्या अटी लादल्या होत्या. उद्धव ठाकरे, पवारांच्या सभांना उपस्थितीची मर्यादा कधी लावली होती का ? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे. गुन्हा दाखल होणार, हे आम्हाला माहिती होतंच, असंही पुढे ते म्हणाले.
मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई
मनसे पदाधिकाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई करायला सुरूवात केली आहे. मुंबईत सर्वात आधी भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवणारे चांदीवलीचे मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलीसांनी प्रतिबंधक खबरदारी म्हणून ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांच्या ऑफिसमधून पोलीसांनी भोंगेही जप्त केले आहेत.