Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर जिल्हाध्यक्ष बदलला! अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती!

मिरा भाईंदर: मिरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची तडकाफडकी हकालपट्टी करून अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अरुण कदम यांना आज जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवली.

चार वेळा नगरसेवक ते उप नगराध्यक्ष पदावर राहिलेले अरुण कदम यांच्याकडे प्रदीर्घ असा राजकीय अनुभव असून काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा अनेक पक्षांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर राहून पक्ष संघटनेचे कार्य केले असून मिरा भाईंदर शहरामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

अरुण कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शहराध्यक्ष असताना अत्यंत कमी कालावधीत महानगर पालिका निवडणुकीना सामोरे जाताना त्यांनी एक हाती लढाई लढून पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे चार नगरसेवक निवडून आणले होते. त्यानंतर मीरा-भाईंदर वसई-विरार पालघर जिल्हा संघटक सारख्या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते. परंतु मनसेमध्ये पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे कंटाळून त्यांनी अखेर मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत विधानसभा प्रमुख पदावर असताना देखील 2017 च्या महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले आणि एव्हढेच काय तर त्यांनी आपल्या पत्नी अर्चना कदम सोबतच चार नगरसेवकांचा संपूर्ण प्रभाग निवडून आणला होता. त्यांच्या पत्नी अर्चना कदम आजही शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

विधानसभा प्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेत देखील पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली आणि काही काळ राजकारणा पासुन अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. परंतु काही काळानंतर शहरातील राजकीय परिस्थिती आणि आपल्या समर्थकांच्या आग्रहा खातर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला होता.

अरुण कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असताना तेव्हाच त्यांच्यावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार अशी शक्यता वर्तविली जात होती परंतु त्याच वेळी भाजप सोडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील आणि काँग्रेस पक्ष सोडून आलेले अंकुश मालुसरे या तिघांत जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनपेक्षित निर्णय घेत अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती न करता अचानकपणे तत्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना हटवून अंकुश मालुसरे यांची नियुक्ती करण्यात आली.

अंकुश मालुसरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्या नंतर पक्ष संघटना तर वाढली नाहीच उलट त्यामुळे पक्षाच्या दोन वर्षाचा महत्त्वाचा काळ वाया गेला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आपला जिल्हाध्यक्ष बदलण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. अखेर मिरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची निराशाजनक कामगिरी पाहता मीरा भाईंदर शहर जिल्ह्याचे समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन अंकुश मालुसरे यांना पदावरून हटवून त्यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्त केली त्या ठिकाणी अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष पदावर अरुण कदम यांची नियुक्ती केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन बळकटी येईल त्याच बरोबर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करुन दाखवेल असा निर्धार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आता व्यक्त केला जात आहे.

अरुण कदम यांची समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याची कार्यपद्धती, शहरातील त्यांचा चाहता वर्ग पाहता मिरा भाईंदर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या काळात पक्ष संघटना बळकट करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान अरुण कदम यांच्यासमोर आहे. अरुण कदम या आव्हानाला कशा रीतीने जात सामोरे जातील हे पाहणे महत्त्वाचे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केल्यामुळे मिरा भाईंदर शहरातील राजकारणामध्ये एक मोठा फेरबदल घडला असल्याची चर्चा केली जात असून शहरातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षांत बदलले पाच जिल्हाध्यक्ष!

माजी नगरसेवक आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्या नंतर मिरा भाईंदर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक दिवस नेतृत्वहीनच राहिला होता. त्यानंतर इच्छा नसताना काँग्रेसचे माजी नगरसेवक जयवंत पाटील यांना जिल्हाध्यक्ष नेमले गेले परंतु राजकारणात राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गणेश नाईक, संजीव नाईक यांचे समर्थक मानले जाणारे प्रकाश दुबोले यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. काही काळानंतर प्रकाश दुबोले हे देखील राष्ट्रवादी सोडून आपले व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी भाजपमध्ये गेले. त्यांनी पक्ष सोडल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा काही काळासाठी नेतृत्वहीन झाला.

2017 च्या महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्यामुळे त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. अशा कठीण अवस्थेत पक्षाचे पद घ्यायला कुणीच पुढे येत नसताना संतोष पेंडुरकर यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. संतोष पेंडुरकर जिल्हाध्यक्ष पदावर असताना पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला होता. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अरुण कदम यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली जाणार अशी जोरदार चर्चा केली जात असताना पक्षाने अनपेक्षितपणे अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष नियुक्ती केल्यामुळे पक्षात आणखीन एक नवीन वाद निर्माण झाला होता. आणि जेमतेम दोन वर्षे कार्य केल्यानंतर आता अंकुश मालुसरे यांची देखील नियुक्ती रद्द करून आता अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेली पाच वर्षांत पाच जिल्हाध्यक्ष बदलण्याची करामत केली आहे. आता अरुण कदम यांच्या नेतृत्वखाली पक्षाला स्थैर्य मिळेल आणि येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *