संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
हायवेवर प्रवास करताना टोल प्लाझावर लांब रांगांपासून वाचण्यासाठी सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक टोल’ कलेक्शन सिस्टम अर्थात ‘फास्ट टॅग’ ही प्रणाली लागू केली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासह टोल भरण्यासाठीची पद्धतही सोपी झाली. ‘फास्ट टॅग’ आपल्या मोबाइलवरुनच रिचार्ज करता येतो. पण कधी ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करताना तुमची एखादी चूक तुमचं मोठी नुकसान करू शकते.
‘पेटीएम’, ‘फोन पे’ किंवा कोणत्याही इतर पेमेंट ऍप वरुन ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या गाडीचा नंबर टाकावा लागेल. जर तुम्ही चुकून दुसरा एखादा नंबर टाकला तर अकाउंटमधून पैसे तर कट होतील पण रिचार्जदेखील होणार नाही.
‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्याआधी तुमचा ‘फास्ट टॅग’ एखाद्या बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. रिचार्ज करण्याआधी युजरला बँक डिटेल्स टाकावे लागतात. चुकीचे डिटेल्स भरल्यास रिचार्ज कॅन्सल होतो आणि अकाउंटमधून पैसे कट केले जातात. जर तुम्ही तुमची जुनी गाडी एखाद्याला विकली असेल तर त्याचा ‘फास्ट टॅग’ डिअॅक्टिव्हेट करा. जर असं केलं नाही, तर गाडी तुमची नसूनही टोल प्लाझावर तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होत राहतील.
जर ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करण्यासाठी कोणतीही समस्या येत असेल, एक्स्ट्रा पैसे कट होत असतील, तर एनएचएआय च्या १०३३ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. ही हेल्पलाइन ‘फास्ट टॅग’ संबंधित समस्या सोडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
तसंच वेळोवेळी तुमच्या ‘फास्ट टॅग’ चा बॅलेन्स चेक करा. ज्यावेळी ‘फास्ट टॅग’ मध्ये कमी पैसे असतील त्यावेळी लगेच रिचार्ज करणं फायद्याचं ठरेल. जर ‘फास्ट टॅग’ मध्ये रिचार्ज नसेल, तर टोल प्लाझावरुन जाताना तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागू शकतात.