शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर, आयुक्तांनी पुष्गुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत!
मिरा भाईंदर: कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा बुधवार १५ जून रोजी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मिरा भाईंदर शहरातील महानगर पालिकेच्या शाळेतील नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांचे महापौर ज्योत्स्ना हसनाले व आयुक्त दिलीप ढोले यांनी महानगर पालिकेच्या इतर अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत पुषपगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र या प्रसंगी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पहिल्याच दिवशी शाळेत आलेले जवळपास सर्वच विद्यार्थी शाळेचा गणवेश आणि पायात चप्पल बूट न घालता आलेले दिसत होते.
या संदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितनुसार विद्यार्थ्यांच्या गणवेश, पादत्राणे, बॅग आणि इतर शालेय वस्तू मागविण्यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यातच स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या गणवेश व शालेय वस्तू मागविण्याचा कार्यादेश संबंधित ठेकेदारास देणे अपेक्षित होते. परंतु तत्कालीन सहायक आयुक्त प्रियांका भोसले आणि उपायुक्त अजित मुठे या दोघांमधील हेव्यादाव्यामुळे निविदा प्रक्रियाच करण्यात आली नाही आणि त्यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला ह्या कामाचा ठेका देण्याच्या चुरशिमुळे गणवेश व शालेय वस्तूंच्या कामाची निविदा काढण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे करदात्या नागरिकांच्या लेकिन पैशातून लाखों रुपये खर्च करून मौजमजेसाठी शहरातील सर्व पक्षाचे नगरसेवक, अधिकारी मेघालय सारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात परंतु त्याच ठिकाणी शहरातील विद्यार्थी मात्र गणवेश विना शाळेत जात आहेत ही बाब महानगर पालिका आयुक्त आणि शहरातील लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणी असल्याचे बोलले जात आहे.
बुधवार १५ जून रोजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी भाईंदर पश्चिम येथील शाळेला व अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (शिक्षण) अजित मुठे यांनी काशिगाव शाळा क्रमांक ४ आणि ५ व नवघर येथील शाळा क्रमांक १३ या ठिकाणी भेट देऊन नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. या प्रसंगी सभागृह नेता प्रशांत दळवी, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग संजय दोंदे, मुख्याध्यापक, शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
दोन वर्षाच्या अंतराने अखेर मनपाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी देखील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व शालेय वस्तूंचे वाटप झालेले नाही. आता येणाऱ्या काळात उशिराने का होईना विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.