संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना एकीकडे स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. काही निर्णयांमध्ये बदलही करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये पेटलेल्या आरोप युद्धाला आता पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊतांच्या आरोपांमुळे जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलीसांनी बरखास्त केली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ईडीवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात मुंबई लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होत. ५९ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप प्रकरणी हा ईओडब्लू नंतर एसीबी ने गुन्हा दाखल केला होता.
मात्र, संजय राऊत यांनी उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्यामार्फत बिल्डरांकडून पैसे उकळल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर केला. त्यानंतर या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबई पोलीसांनी बरखास्त केल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. दरम्यान, हा निर्णय किरीट सोमय्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा अडचणीत सापडले होते. पण आता नवलानी प्रकरणच बरखास्त केल्यामुळे सोमय्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. जितेंद्र नवलानी नावाची एक व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल करते असा आरोप त्यांनी यावेळी केला होता. या आरोपानंतर कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावे एक तक्रार दिली होती. ८ मार्च २०२१ या दिवशी ही तक्रार दिली होती. या तक्रारारीच्या १ वर्षानंतर म्हणजे २२ मार्च या दिवशी मुंबई पोलीसांनी या तक्रारीच्या आधारावर जितेंद्र नवलानी संबंधीत ५ कंपन्यांना आणि ज्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्याशी संशयास्पद व्यवहार केले आहेत अशा कंपन्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत.