मिरा भाईंदर: पावसाळा सुरू होताच मिरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस नुकताच पावसाळा सुरु झाला असताना मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच निष्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात आल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे.
अशाच प्रकारे गेल्या मंगळवारी (5 जून) घोडबंदर रोड येथील काजुपाडा येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एका 37 वर्षीय दुचाकीस्वार अचानक अडखळून पडला आणि त्याच्या अंगावरून मागून येणारी एसटी बस गेली त्यामुळे त्या दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनेमुळे मीरा-भाईंदर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीरा-भाईंदर शहराचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना लेखी पत्र देऊन मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे शास्त्रोक्त पद्धतीने ताबडतोब बुजविण्याची मागणी केली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने जर त्वरित कारवाई करून शहरातील सर्व खड्डे ताबडतोब बुजविले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठे जन आंदोलन केले जाईल असा इशारा अरुण कदम यांनी दिला आहे.
मीरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण आणि नव्याने होत असलेले काँक्रिटचे रस्ते यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेकदा केलेले ऐकायला मिळतात. शहरातील अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे रस्ते बनविले गेले असून त्याचा परिणाम असा होतो की काही दिवसातच त्या रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले जातात. पावसाळा सुरू झाला असला तरीही मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी काँक्रिट रस्त्यांचे, नाल्यांचे, गटरांचे काम चालू आहे. त्यासाठी ठेकेदारांनी रस्ते, नाले खोदून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.
पावसाळ्याच्या आगोदरच सर्व नाल्यांची सफाई केली जावी, शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, रस्त्यांची, नाल्यांची, गटारांची नवीन कामे केली जाऊ नये असे असताना भर पावसात देखील अनेक ठिकाणी काँक्रिट रस्त्यांचे, नाल्यांचे, गटारांची विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी ठेकेदारांनी रस्ते खोदून ठेवले आहेत. यावरून महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कामकाजात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तर ठेकेदारांच्या फायद्यासाठीच पावसाळ्यात देखील टेंडर काढली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
शहरातील अनेक ठिकाणी या खड्ड्यांमुळे पादचारी नागरीक किंवा दुचाकीस्वार घसरून पडून जखमी तर होतातच तर काही प्रसंगी मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा सोबतच भ्रष्टाचाराचा करदात्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
घोडबंदर रोडवरील काजुपाडा येथे रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराला मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन महानगरपालिकेस ताबडतोब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आणि जर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ते दुरुस्ती केली नाही तर मोठे जन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
आता मिरा भाईंदर महानगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कारवाई करते का? हे पाहावे लागेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची दुरुस्ती सध्या तरी करणे शक्य नाही असेच दिसत आहे.