संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेनेवरून सुरू असलेल्या वादाच्या लढाईने आता वेगळे वळण घेतले आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ८ ऑगस्टची मुदत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ कोणाकडे राहणार याचा निर्णयही ८ ऑगस्टला होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. शिंदे गटाने भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह असल्याचा दावाही शिंदे गटाने केला आहे.
एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आपल्याच गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात ही लढाई सुरू होती, आता हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग आपला निर्णय जाहीर करेल. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या गटांना ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.