संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गितेंनी आज मोठं वक्तव्य केलं. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केलं ते बंड स्वबळावर केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप पुरस्कृत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत केली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजप रचित हे बंड :
छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केलं. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार जरुर केला, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती. त्या बंडाचं कारस्थान काँग्रेसने रचलेलं नव्हतं. मात्र सध्याचं बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित हे बंड असल्याची टीका गीते यांनी केली.
आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता :
पुढे गिते म्हणाले ”घराघरांत कलह आहेत, वाद आहेत आणि आपली आई संकटात असेल तर आपण कलह करत बसणार नाही, तर आईला वाचवणार. आज शिवसेना संकटात आहे, ही आपली आई संकटात आहे. आपल्याला आईला वाचवायचं आहे. आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता आहे, आणि आज ही आई संकटात आहे, तिला आपल्याला वाचवायचं आहे.”
उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे :
उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे, आणि यामध्ये या गद्दारांना गाडून टाका” असेही गिते म्हणाले आहेत. एकनाथ शिदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानतंर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात मागच्या काही काळापासून संघर्ष चालू आहे. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांना संबोधित करत आहेत.