Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला ! – मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला होता, प्रधानमंत्री स्वनिधी पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला, मा.पंतप्रधानांच्या या योजनांमुळे अनेक लोकांचे संसार वाचले व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे कल्याण डोंबिवलीतील पथ विक्रेत्यांसाठी आयोजित स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवा प्रसंगी, दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलताना मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी मा.कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज प्रशासकीय महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, नगर परिषद प्रशासनाचे रोहिदास दोरकुळकर,केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाचे वैभव खानोलकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी नगरसेवक विनिता राणे, रवी पाटील, भाजपाचे प्रेमनाथ म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाले, पथविक्रेते यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होत आहे. फेरीवाले यांनाही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मदत करावी या बरोबरच नागरिकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी असेही ते पुढे म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वनिधी योजनेचे चांगले काम केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला सर्वतोपरी मदत केली जाईल. नागरिकांनीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

कोरोनामुळे रोजगार गेलेल्या सर्वसामान्याना मदत व्हावी, यासाठी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली आहे, याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध आठ योजनेमुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्याचे कामही विमा योजनेमुळे झाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रधानमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. जास्तीजास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा असे उद्गार मा.कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज यांनी यावेळी आपल्या भाषणात काढले.

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. महानगरपालिकेस १४९७० पथविक्रेत्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्यानुसार ७४३१ पथविक्रेत्यांचे कर्ज मागणी अर्ज भरण्यात आले आहेत आणि त्यापैकी २४८६ पथविक्रेत्यांना रु. दहा हजाराचे कर्ज विविध बँकांद्वारे उपलब्ध झाले आहे अशी माहिती प्रशासकीय महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. यावेळी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच दहा पथ विक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात परिचय पत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. स्वावलंबी पथ विक्रेत्यांच्या या प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवास फेरीवाल्यांचा पथविक्रेत्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला महापालिकेचे सावित्रीबाई फुले कलामंदिर या महोत्सवाच्या वेळी गर्दीने तुडुंब भरल्याचे दिसून आले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *