संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नववी स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा २०२२-२३ उत्तराखंडमधील हरिद्वार येथे २७ ते २९ जुलै कालावधीत घेण्यात आली. यात महाराष्ट्राचा संघ २०१ विद्यार्थ्यांसह, श्री. सुनील शिंदे महाराष्ट्र सचिव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाला होता. यात सुवर्ण १२०, रजत ४५ , व २० कांस्य पदक पटकावत सदर स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल राहिला. या स्पर्धेत श्री.गणेश बागुल यांनी महाराष्ट्राचे मॅनेजर म्हणून काम पाहिले तसेच श्री.अविनाश ओंबासे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले.
या ९ व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत योगा, बुद्धिबळ, कॅरम, कुस्ती, कराटे, कबड्डी, इत्यादी खेळांचा समावेश होता. डोंबिवलीतील ‘होली ऍंजेल्स’ शाळेचे ६ विध्यार्थी जिल्हा आणि राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजय प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. तसेच ‘चंद्रकांत पाटकर’ विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला होता. ‘होली ऍंजेल्स’ शाळेच्या सहाही विध्यार्थ्यानी चुरशीने खेळून स्पर्धेत पदके प्राप्त केली, यामध्ये २ सुवर्ण पदक, ३ रजत आणि १ कांस्य पदक मिळविले. निरव अढळकर आणि अर्विना मरगजे (सुवर्ण पदक) , शर्विल गमरे, वैष्णवी पाटील , ओम दांडे (रजत पदक) आणि प्रशवेत भोसले (कांस्य पदक) मिळवत महाराष्टाला अव्वल स्थान मिळवून दिले. तसेच पाटकर विद्यालयाने देखील कॅरम मध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य आणि बुद्धिबळ स्पर्धेत १ रौप्य पदक मिळवले. सर्व खेळाडूंचे संघ प्रशिक्षक म्हणून राजू घुले आणि विवेक म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्या.
या स्पर्धेत एकूण २० राज्यातील विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये सहभाग घेतला होता, यामध्ये महाराष्ट्राने पदक तालिकेत प्रथम क्रमांक मिळवला तर आसाम दुसऱ्या स्थानी आणि आंध्रप्रदेशने तिसरा क्रमांक मिळवला. गिरिमित्र प्रतिष्ठानचे श्री.मंगेश कोयंडे आणि पदाधिकारी यांनी या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कल्याण स्थानकावर उत्स्फूर्तपणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच डोंबिवली स्थानकावर आगमन होताच ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता कि जय’, या जय घोषात आणि टाळ्यांचा कडकडाटात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री.मितेश पेणकर, सौ.जयश्री पांजणकार, ग्रामीण महिला आघाडी तसेच विलास खंडीजोड भाजपा जिल्हा सचिव आणि युवा कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.