संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शुक्रवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील ६४ नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठं खिंडार पडलं आहे. तब्बल ५० वर्षांचा प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. राहुल गांधींनी काँग्रेसची संपूर्ण सल्लागार यंत्रणा उध्वस्त केल्याचा आरोप करीत ते पक्षातून बाहेर पडले.
आता त्याच्यापाठोपाठ माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह माजी मंत्री माजीद वाणी, डॉ. मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि माजी सरचिटणीस विनोद मिश्रा यांनीही काँग्रेसला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. या सर्व ६४ नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एकत्रित राजीनामे सादर केले आहेत.
गुलाम नबी आझाद लवकरच जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष सुरू करणार आहेत. अनेक माजी मंत्री आणि आमदारांसह अनेक प्रमुख काँग्रेस नेते, पंचायती राज संस्थेचे (पीआरआय) शेकडो सदस्य, नगरपालिका नगरसेवक आणि जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील नेत्यांनी आधीच काँग्रेस सोडून आझाद यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
१७ ऑक्टोबर २०२२ ला ‘काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष’ पदासाठी निवडणूक होणार आहे, परंतु सर्वच मोठ्या चेहऱ्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याने पक्षाची ची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. अंतर्गत कलहामुळे काँग्रेस रसातळाला जातांना दिसत आहे याचा खेद वाटत आहे.