Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

सरकारने मच्छीमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा! शिवसेनेच्या नगरसेविकेची मागणी!

संपादक: मोईन सय्यद/मिरा-भाईंदर प्रतिनिधी

उत्तन,भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या महिन्याभरा पासून खाण्याजोगी मासळी जाळ्याला मिळत नसून अरबी समद्रात फक्त जेली फिशच जाळ्यात येत असल्यामुळे उत्तनचे मासेमार कोळी बांधव हवालदिल झाले आहेत.

अशा परिस्थितीत मच्छीमार बांधव बेजार होऊन थकलेले आहेत त्यामुळे मच्छीमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उत्तनच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी गंडोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

नारळी पौर्णिमा झाल्यानंतर समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटींना आता फक्त जेली फिशच मिळत आहेत. जेली फिश खाण्यासाठी उपयोगी नसल्यामुळे बाजारात त्याची किंमत शून्य असते.

ही जेली फिश मासळी नसून ती फक्त एक टाकाऊ वस्तू असल्यामुळे आणि तिच्यामध्ये पाणी भरून ती खूप वजनी झालेली असते.

अनेक जातीच्या जेली फिश तर विषारी देखील असतात त्यामुळे बोटीवर उचलून जाळीतून बाहेर काढून टाकताना मच्छीमारांच्या अंगाला खाज देखील येते.

अरबी समुद्रात हा प्रकार एक महिना उलटून गेला तरी चालूच असून खाण्यासाठी उपयोगी असलेली मासळी जाळ्यात सापडत नाही. त्यामुळे उत्तन परिसरातील कोळी बांधव हैराण झाले आहेत.

अशा परिस्थितीत बोटीच्या इंजिनाला लागणारा डिझेल, बर्फ, खलाश्यांचा पगार, त्यांचे जेवण व इतर बोटीवरील आवश्यक वस्तू याचा खर्च परवडणारा त्यामुळे कोळी बांधव कर्ज काढून फसला असल्याचे दिसत आहे.

हे सर्व गेल्या महिन्यात आलेल्या वादळामुळे झाले असून समुद्रात खाण्यासाठी उपयोगी पडणारी मासळी मिळत नसल्यामुळे मच्छीमार बांधव हैराण झाले आहेत.

शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस कधी पडला नाही तर दुष्काळ जाहीर केला जातो, तर कधी जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर ओला दुष्काळ जाहीर केला जातो आणि सरकार ताबडतोब शेतकऱ्यांना मदत जाहीर करते.

परंतु जर मच्छीमारांवर कधी अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आले तर मात्र सरकार मच्छीमार कोळी बांधवाना कधीच मदत जाहीर करत नाही! असा असंतोष उत्तन परिसरातील मच्छिमारांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.

मच्छिमार कोळी बांधव देखील या देशाचे नागरिक असून त्यांच्या मच्छिमारीच्या व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल केली जात असते. मच्छिमार सरकारला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देत असतात.

आपला भारत देश जगाच्या पाठीवर पाचवा क्रमांक मिळवून आर्थिक महासत्ता बनला आहे. त्यामध्ये मत्स्य व्यवसायाचा देखील फार मोठा वाटा आहे.

मग नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जशी आर्थिक मदत केली जाते. तशी आर्थिक मदत मच्छिमार बांधवाना का केली जात नाही? मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर असा अन्याय का केला जातो? असा सवाल मच्छीमार कोळी बांधव करीत आहेत.

महाराष्ट्र सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उत्तन परिसरातील सर्व कोळी-मासेमारी संघटना करीत आहेत.

सरकारने सर्व कोळी-मच्छिमारांच्या बोटींचे पंचनामे करून शासनाच्या मत्स्य विभागा तर्फे अहवाल सादर करावा आणि त्यानुसार मच्छीमारांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मच्छिमार बांधव करत आहेत.

उत्तनच्या मच्छीमारांच्या या मागणीला ध्यानात ठेऊन शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी गंडोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन मच्छिमारांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष वेधून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

देशाचा शेतकरी बळीराजा जेव्हा आर्थिक अडचणीत सापडल्यावर आत्महत्या करतो. तेव्हा सर्वच राजकीय पक्ष सरकारवर टीका करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यास सरकारला भाग पाडतात. परंतु समुद्रातील मासा पाण्या मध्ये रडतो. अशी अवस्था मच्छीमार बांधवांची होते तेव्हा मात्र त्यांचे अश्रू दिसत नाही.

त्यामुळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मस्त्यपालन मंत्री यांनी मच्छीमारांना आर्थिक मदत करण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *