संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांचे आज सकाळी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचं निधन झालं. गेल्या ४० दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत होती पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि अखेर आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली.
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या राजू श्रीवास्तव याला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्षे प्रेक्षकांना ‘गजोदर भैय्या’ बनून हसवणाऱ्या या अभिनेत्याचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत, अखेर त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. आता त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.