संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या परवानगीवरुन शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोल्हापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. उच्च न्यायालयाने अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली होती. याविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, दीपक केसरकर यांनी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला परवानगी हवी असती तर आमच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मिळाली असती. परवानगी आधी कोणी मागितली त्यावर हा निर्णय देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. ते रविवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उच्च न्यायालायने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता कायदा व सुव्यवस्थेचे पालन होईल, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना द्याव्यात. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे ठाकरे गटाने पालन करावे. शिंदे गटाचा बीकेसीच्या मैदानात होणारा मेळावा, हा सर्वात मोठा असेल. हा मेळावा शांततेत पार पडेल. आमचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा असेल. या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थान नसेल हेच स्पष्ट केले जाईल. ठाकरे गटाच्या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचं सोनं लुटायचं असेल हे बाळासाहेबांनी कधीच होऊ दिलं नसतं. जर तसं होणार असेल तर मी काही बोलू शकत नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.