Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

पंकजा मुंडेंच्या विधानावर त्यांच्या कडूनच अधिक स्पष्टीकरण घ्या, मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये त्यांच्या भाषणात केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले –

“मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे,” असं सांगत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे.

पुढे ते म्हणाले “अनेकदा असं होतं की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव असावा असं मला वाटतं”. यासंबंधीच अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतलं पाहिजे असंही त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं.

पंकजा मुंडेंचं वक्तव्य काय ?

“आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडेंनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण करत म्हटलं आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *