संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ तर्फे दर वर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी देखील दि.२८ सप्टेंबर रोजी रॅबीज दिनानिमित्त एक आठवड्याचा भटक्या श्वानांसाठी रॅबीज लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आठवड्यात दिनांक १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत १५८४ भटके कुत्रे व भटक्या मांजरींना रॅबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. तसेच २८ सप्टेंबर रोजी गणेश मंदिर डोंबिवली येथून एक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये प्रकाश विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर, प्रगती कॉलेज व एमकेएम पटेल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक श्वानप्रेमी व प्राणी प्रेमी व व्हिपीडब्ल्यूए चे सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅली नंतर एका चर्चासत्राचे आयोजन गणेश मंदिर हॉल येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे माजी अध्यक्ष डॉक्टर मनोहर अकोले व अध्यक्ष अजय कुलकर्णी यांची भाषणे झाली. रोटरी क्लबतर्फे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात एक मागण्यांचे निवेदन महापालिकेस देण्यात आले. या चर्चासत्रात बोलताना डॉ.अश्विनी पाटील यांनी नागरिकांनी त्यांच्या जबाबदारीचे पालन करावे व महापालिका या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न व सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. डॉ. मकरंद गणपुले यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रात व्हींपीडब्लूए चे सदस्य, रोटरी सदस्य, श्वान प्रेमी, प्राणी प्रेमी, शालेय व कॉलेज विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.