नियमबाह्य पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार दिले उद्यान विभागाला!
मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले जेंव्हा पासून शहरात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करीत आहेत तेंव्हा पासून त्यांनी अनेक वादग्रस्त आणि नियमबाह्य निर्णय घेतले असल्याची चर्चा आता शहरात सर्व स्तरातून केली जात आहे. महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतल्या नंतर दिलीप ढोले यांनी मी म्हणजेच कायदा अशा पद्धतीने कार्य करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासक म्हणून कार्यरत असताना दिलीप ढोले यांनी गेल्या चार महिन्यात दोनशेहून जास्त प्रशासकीय ठराव मंजूर केले असून त्या ठरावांपैकी अनेक ठराव हे नियमबाह्य असल्याचे बोलले जात आहेत. त्यातच त्यांनी आता आणखीन एक नियमबाह्य आणि वादग्रस्त तुघलकी फर्मान काढले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार उद्यान विभागाला दिले असून नियमांचा भंग केला असल्याचे दिसून येत आहे.
मुळात शहरातील सर्व विभागांचे बांधकाम (स्थापत्य) व विद्युत याचे नवीन बांधकाम किंवा देखभाल दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फतच केली जातात. त्याकरिता आवश्यक असलेला शैक्षणिक अर्हता प्राप्त शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता असा प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी वर्ग सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्त केलेला असतो. त्या अधिकारी कर्मचारी वर्गा मार्फत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करूनच सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे स्थापत्य अथवा विद्युत यांची विकासकामे केली जातात. मात्र सध्या उद्यान विभागात फक्त एकच कंत्राटी कनिष्ठ अभियंता नियुक्त केलेला आहे. तोच अंदाजपत्रक तयार करतो आणि नगररचना विभागाचे अभियंता सचिन पाटील त्यावर सह्या करीत आहेत.
मुळात कोणत्याही विकासकामांचे १०० टक्के अंदाजपत्रक तपासण्याचे काम उपअभियंत्या मार्फत केले जाते अंदाजपत्रक तपासून त्या अंदाजपत्रकाची कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांची तांत्रिक मान्यता घेऊन पुढील प्रक्रिया उद्यान विभागातर्फे करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश उद्यान विभागाकडून काढले जातात. ज्या बांधकामांचे कार्यादेश दिले आहेत त्यांची कामे निविदेनुसार आणि अंदाजपत्रकानुसार करून घेणे आवश्यक असते. त्या बांधकामाचे साहित्याची गुणवत्ता प्रयोग शाळेत व जागेवर तपासणी करून घेणे, बांधकामाचे त्रयस्थ लेखापरीक्षण करून घेणे, दररोज बांधकामाचे मोजमापाची नोंद करणे हि कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचे बांधकाम यांच्या नियम पुस्तिकेनुसार स्थायी कनिष्ठ अभियंता व उप अभियंता यांची असून मोजमापे नोंदवून १०० टक्के तपासून उप अभियंता यांना नोंद घ्यावी लागते, तर कार्यकारी अभियंता यांना ५ टक्के तपासणी करून नोंद घ्यावी लागते. हि सर्व प्रक्रिया प्रशिक्षित अनुभवी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली standard specification नुसार पार पाडावी लागते आणि हीच कार्यपद्धती असताना प्रशासक दिलीप ढोले यांनी मात्र उद्यान विभागाला बांधकाम आणि विद्युत विषयक कामे देऊन नियमाचा भंग केला असल्याचे बोलले जात आहे. हि कामे एका कंत्राटी कनिष्ठ अभियंता यांचेवर सोपविता येत नाहीत.
त्याच बरोबर उद्यान विभागातील उपमुख्य उद्यान अधीक्षक आणि उपायुक्त(उद्यान) यांना बांधकाम व विद्युत कामांच्या अंदाजपत्रकावर सह्या करण्याचे अधिकार देखील नाहीत. त्याच बरोबर मोजमाप पुस्तिकेवर देखील सह्या करण्याचे अधिकार त्यांना नाहीत किंवा कायद्यात तशी तरतूद देखील नाही.
“उद्यान विभागात सध्या स्थापत्य आणि विद्युत यांचे कार्य करण्यास आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त एकही अभियंता किंवा अधिकारी नियुक्त केलेला नसताना आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी उद्यान विभागाचे अधिकारी हंसराज मेश्राम आणि नागेश वीरकर यांचा बालहट्ट पुरविण्यासाठीच आणि आर्थिक हित जोपासण्यासाठी हा तुघलकी निर्णय घेतला आहे असे बोलले जात आहे”
अशा प्रकारे जर एका कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांकडून कामे करून घेतली तर त्या कामांची गुणवत्ता राखली जाईल का? किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचे बांधकाम यांच्या नियम पुस्तिकेनुसार जर काम झाले नाही आणि त्यामुळे जर भविष्यात काही गंभीर समस्या निर्माण झाली तर त्यासाठी जबाबदार कोण असणार? जर बांधकाम आणि विद्युत यांची कामे महानगरपालिकेच्या इतर विभागा मार्फत केली जाणार असतील तर मग बांधकाम विभागाची गरजच काय? असा प्रश्न आता निर्माण झालेला असून आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले मात्र आपल्या मनमर्जी प्रमाणे नियमबाह्य आणि तुघलकी निर्णय घेत असल्याची चर्चा मिरा-भाईंदर शहरात केली जात आहे.