मीरा भाईंदर, प्रतिनिधि : भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास तीन लहान मुलांसह 13 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून या नागरिकांचे जीव वाचविले म्हणून शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
त्या निमित्ताने आज मंगळवार 19 जानेवारी रोजी मीरा भाईंदर शहरातील स्वाभिमान संघटने तर्फे अग्निशमन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कौतुकास्पद कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे व त्यांचे सर्व अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी व मिरा भाईंदर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मनोज राणे सोबत कृष्णा दरेकर, देवदास सावंत व विजय इंदुलकर इत्यादी उपस्थित होते.
स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीवर आपण नेहमीच टीका करीत असतो हे तर नेहमीचेच झालेले आहे परंतु एखाद्या वेळी महापालिका प्रशासनाच्या एखाद्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी एखादी चांगली कामगिरी केली असेल तर त्याचे कौतुक देखील केले पाहिजे जेणेकरून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करण्याचा उत्साह वाढला जातो आणि म्हणून आम्ही अग्निशमन दलाच्या जवानांचा आज सत्कार केला अशी प्रतिक्रिया स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मनोज राणे यांनी दिली आहे.
भाईंदर पश्चिमेकडे मॅक्सस मॉलच्या समोर असलेल्या डी मार्ट या शॉपिंग मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी येत असतात. तीन माजल्याचे हे डी मार्ट शॉपिंग मॉल गर्दीने गजबजलेले असते. या डी मार्टमध्ये वरच्या तीन मजल्यावर जाण्यासाठी जिन्या सोबतच लिफ्ट देखील लावण्यात आलेली आहे आणि खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक त्या लिफ्टचा वापर मोठया प्रमाणावर करीत असतात.
रविवारी सायंकाळी 7.45 सुमारास अशाच प्रकारे 15 जण लिफ्टचा वापर करून वर जात असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लिफ्ट अचानक बंद पडली आणि ते 15 नागरिक लिफ्टमध्ये अडकल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अडीच तास अथक प्रयत्न करून मोठ्या शिताफीने या 15 जणांची सुटका केली आणि उपस्थित सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सर्व जवान शहरातील कोणत्याही प्रकारच्या आणी-बाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज व तत्पर असतात आणि एखाद्या संकटाच्या वेळी संपूर्ण शहरातील कोणत्याही ठिकाणी किमान पाच ते दहा मिनिटात पोहोचले पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्वरित मदत करता येईल त्यानुसार मी माझ्या सर्व सहकार्यांना सूचना दिल्या आहेत आणि तशी आमच्या अग्निशमन दलाची तयारी देखील आहे. माझ्या विभागातील सर्व जवान व अधिकारी मी दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करतात याचे मला समाधान आहे आणि या विभागाचा मी विभाग प्रमुख आहे याचा मला अभिमान देखील आहे. – प्रकाश बोराडे (मुख्य अग्निशमन अधिकारी)