मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: रूढीवादी मुस्लिम समाजातील मुलींना उच्च शिक्षण देण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लिम समाजातील मुलींना तर लहान वयातच लग्नाच्या बेडीत अडकवून तिच्या संसारात गुंतवून टाकले जाते. त्यामुळे मुस्लिम समाजातील मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु समाजाच्या रूढीवादी विचार धुडकावून लावत विपरीत परिस्थितीत देखील काही मुली दैदिप्यमान यश मिळवून आपले आणि आपल्या आई-वडिलांचे नाव लौकिक करतात. अशीच एक कहाणी आहे मुस्लिम समाजातीलच मिरारोड पूर्वेकडील नया नगराच्या रुहीन खानची जिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET परीक्षेत ७२० पैकी ६९६ गुण मिळविले असून मीरा-भाईंदर शहरात सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. हि गोष्ट जेव्हां काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांना समजली तेव्हां त्यांनी देखील रुहीन खान व तिची आई यांना आपल्या निवासस्थानावर सन्मानपूर्वक बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला.
यामध्ये रुहीन खान हिचे विशेष परिश्रम तर आहेतच परंतु तिच्या ह्या यशामध्ये तिच्या आईचे खूप मोठे योगदान आहे. यामागचे कारण म्हणजे रुहीनचे वडील नोकरीनिमित्ताने परदेशात राहतात व तिची आई आपल्या मुलांसोबत मिरारोड येथील नयानगर परिसरात राहते. रुहीनच्या आईची इच्छा आहे कि तिने डॉक्टर व्हावे म्हणून तिने आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरु केले परंतु रुहीन खान हिला उच्च शिक्षण देण्यासाठी तिच्या नातेवाईकांचा प्रखर विरोध होता. त्यांचे म्हणणे असे होते कि मुस्लिम मुलींनी एव्हढे शिकून काय करायचे आहे? परंतु रुहीन खानाच्या आईने हा विरोध न जुमानता आपल्या मुलीला वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण देण्याचे तिला चांगले कोचिंग क्लासेस पासून हवे ती सर्व मदत केली. रुहीनने देखील आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवत दैदिप्यमान असे यश मिळविले असून तिच्या या यशामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मिरा-भाईंदर शहरातील काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविणाऱ्या अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचा यथोचित सन्मान करून प्रोत्साहन देत असतात. मुझफ्फर हुसैन यांनी रुहीन खानचा व तिच्या आईला सन्मानपूर्वक आपल्या निवासस्थानावर बोलावून त्यांचा सत्कार करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार, नगरसेविका रुबिना फिरोज, गीता परदेशी व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.