भाईंदर, प्रतिनिधी: राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी-स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, ढासळलेली कायदा व सुव्यस्था, महिलांवर होणारे अत्याचार, हल्ले, खून, दारू पिऊन वाहन चालवून चिरडणाऱ्या श्रीमंत पोरांना वाचवणारी भ्रष्ट शासकीय यंत्रणा आदी ज्वलंत प्रश्न न हाताळता त्यांना पाठीशी घालणारी, आपली सत्ता वाचविण्यासाठी गलिच्छ राजकारणात मग्न असलेल्या भ्रष्ट महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देत मिरारोड येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयवर “चिखल फेक” आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा, ब्लॉक काँग्रेस, युवक महिला काँग्रेस, पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, सेलचे पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.