Latest News आपलं शहर ताज्या मराठवाडा महाराष्ट्र

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून विज्ञानवाद सांगितला – ह.भ.प.डॉ.अनिल महाराज मुंढे

अहमदपूर:-
मासूम शेख

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला सत्याची शिकवण दिली असून, त्यांनी ग्रामगीतेतून विज्ञानवाद सांगितला, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अनिल मुंढे बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, विदर्भामध्ये जन्माला आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा या दोन महात्म्यांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडविले. हे दोघेही कर्ते सुधारक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला आणि स्वातंत्र्यानंतर समाजातील व्यसनाधिनता आणि अंधश्रद्धा संपावी म्हणून चळवळ हाती घेतली. खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी केलेले केलेल्या अमूल्य कार्याचा वारसा त्यांचे शिष्य सुप्रसिद्ध खंजिरी वादक सत्यपाल महाराज आजही चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, ग्रामगीता हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा आणि अध्यात्माचा पाया आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही सत्यावर, न्यायावर आणि वैश्विक बंधुभावावर आधारित असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामगीतेचे सामुहिक पारायण गावागावातून झाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले तर शेवटी डॉ. सतीश ससाणे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयतील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *