अहमदपूर:-
मासूम शेख
जागतिक सामाजिक विषमतेचे भान असलेल्या महात्मा फुले यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी बहुजनांना व स्त्रियांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे जनक असून पुढे हाच विचार समोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी शाळा सुरू केल्या आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली, असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी डॉ. मारोती कसाब व डॉ. संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की , महात्मा फुलेंवर तत्कालीन परिस्थितीसह शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा प्रभाव ही तेवढाच होता. त्याचबरोबर थॉमस पेन च्या राइट्स ऑफ थॉट्स या ग्रंथामुळे महात्मा फुले यांनी आपले जीवन समाज सुधारण्यासाठी वाहून घेतले. आपण महात्मा फुले महाविद्यालयाचे पाईक आहोत त्यांनी ज्याप्रमाणे मुक्ता साळवे सारखी विद्यार्थी घडविली त्या पद्धतीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी घडवून फुलेंना आपण आदरांजली वाहिली पाहिजे. त्याबरोबर सामाजिक विषमतेच्या निर्मूलनाचे कार्य फुलेंचा विचार समोर ठेवून केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मनोगतात डॉ. संतोष पाटील म्हणाले की, आधुनिक भारताच्या जडणघडणीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांनी विचारातून नव्हे तर आपल्या कृतीतून बहुजनांना गुलामगिरी मुक्तीचा मार्ग दाखविला. यावेळी डॉ. मारोती कसाब यांनीही मार्गदर्शन केले ते म्हणाले की, सनातनी विचारधारेच्या ज्या सात बंदी बहुजनावर होत्या त्यापैकी एक ज्ञानप्राप्तीची बंदी होती. ही बंदी उठविण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि मुक्ता साळवे सारख्या विद्यार्थिनी त्यांनी घडविल्या. महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते इतिहासाचे सत्यशोधक होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती त्यांनी सुरू केली, असेही ते म्हणाले. तसेच उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी महात्मा फुलेंच्या अखंडाचा संदर्भ देत स्वलिखित काव्यातून महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो .डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रशांत बिरादार, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. किरण गुट्टे, प्रा. प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापूरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.