संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिरा भाईंदर
मिरा भाईंदर शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले असून शहरातील सत्ताधारी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले असून राज्य सरकार जाणीवपूर्वक कमी पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोप करून जर शहराला होणार पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर येत्या 12 तारखेला महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी याच विषयावर मीरा-भाईंदर शहराला अपेक्षित पाणीपुरवठ्यापेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने खासदार राजन विचारे यांच्या वतीने 12 ऑक्टोंबर 2020 रोजी अपुरा पाणीपुरवठा संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 125 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जाईल असे ठरले होते. परंतु मीरा भाईंदर मधील नागरिकांना प्रत्यक्षात 93 दशलक्ष लिटर पाणी मिळत होते. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात होणाऱ्या कमी पाणीपुरवठ्याला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
खासदार राजन विचारे यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनामध्ये पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आज बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना तात्काळ बैठकीचे आयोजन करा अशा सूचना करण्यात आल्या होत्या. खासदार राजन विचारे यांनी औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले.
बैठकीला, आमदार गीता जैन, मुख्य अभियंता सुधाकर वाघ, मिरा भाइंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, कार्यकारी अभियंता दीपक खांबीत, सुरेश वाकोडे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शिवसेना गटनेत्या नीलम ढवण, माजी विरोधी पक्ष नेता राजू भोईर व इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मीरा-भाईंदर शहराला कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये मीरा-भाईंदर शहरास अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तो तात्काळ वाढवून नियमित पाणीपुरवठा करणे तसेच आय आय टी यांच्या अहवालानुसार ठाणे साकेत येथे बुस्टिंगची क्षमता वाढविण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेस परवानगी देणे व एमआयडीसी पंपिंगच्या ठिकाणी कचरा साठल्याने पंपिंग बंद होते. त्यासाठी स्क्रीनिंगची यंत्रणा बसविणे. येत्या दोन दिवसांमध्येच 125 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना दिले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व मुख्य अभियंता सुधाकर वाघ यांनी देखील यापुढे मीरा भाईंदर मधील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही असे या चर्चेदरम्यान आश्वासित केले.
मिरा भाईंदर शहरातील पाणी प्रश्नावर यापूर्वी देखील अनेक वेळा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे सोबत बैठकी झालेल्या आहेत अनेक वेळा याच विषयावर चर्चा झालेल्या आहेत परंतु शहराला आजही आवश्यक तेव्हढा पाणी पुरवठा होत नाही आणि याच विषयावर सर्वच राजकीय पक्ष मात्र राजकारण करत आहेत. आताही उद्योग मंत्र्यांच्या आदेशानुसार 125 एम एल डी पाणी मिळेलच याची काही शास्वती दिसत नाही असे बोलले जात आहे.