
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
पालिकेची भूमिका : अर्थचक्र गतिमान करण्यावर भर
मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, रुग्णसंख्या थोडी वाढली तरी पुरेशा खाटा आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी भूमिका पालिकेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबरच्या बैठकीत मांडली. ‘डेल्टा प्लस’च्या भीतीमुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात ठेवून २८ जूनपासून जुनेच निर्बंध लागू ठेवले आहेत. त्यामुळे सगळे व्यवहार थंडावले असून, अर्थचक्र मंदावले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही निर्बंध शिथिल करण्यास हरकत नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचे समजते.
कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाने ही बैठक आयोजित केली होती. कोरोनामुळे लागू होत असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. निर्बंधाबाबत कोरोना कृतिदलाशी चर्चा करून काही दिवसांत राज्य सरकार निर्णय घेईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत आता ‘जम्बो’ रुग्णालयांची संख्या वाढली असून, पुरेशा खाटाही उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांसाठी अन्य सुविधाही उपलब्ध असल्यामुळे थोडे निर्बंध खुले केल्यास रुग्णसंख्या वाढली तरी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम असल्याने रुग्णसेवा पुरविणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात खुले केल्यास फारसा परिणाम होणार नाही असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केले.