Home आपलं शहर नरेंद्र मोदींचे अपयश झाकण्यासाठी सीएम नाही, तर पीएम बदला ! – काँग्रेसचा टोला

नरेंद्र मोदींचे अपयश झाकण्यासाठी सीएम नाही, तर पीएम बदला ! – काँग्रेसचा टोला

0
नरेंद्र मोदींचे अपयश झाकण्यासाठी सीएम नाही, तर पीएम बदला ! – काँग्रेसचा टोला

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गुजरात मध्ये विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा
राजीनामा दिल्यानंतर आज भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पटेल पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भूपेंद्र पटेल यांचं नाव कुठेच नव्हतं. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गोरधन झडफिया यांची नावं चर्चेत होती. मात्र भाजपा नेतृत्त्वानं भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती दिली आहे. मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता भाजपा नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी काही बदल अपेक्षित आहेत. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने ट्विटरवर ‘#सीएमनहींपीएम_बदलो’ ही मोहीम सुरू केली असून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, ‘सीएम नाही, तर पीएम बदला’ असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसने याबाबत काही ट्विट्स केली आहेत. भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही, असं म्हणत काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र, असल्याचं देखील अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे.

देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावरून देखील काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही ? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार ? असं काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलं आहे. याआधी देखील काँग्रेसने विविध मुद्द्यांवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

हरियाणाच्या कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला याचा काँग्रेसने निषेध केला आहे. “तालिबानशी चर्चा करणारे नरेंद्र मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही ?” असा बोचरा सवालही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवावं आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. गेल्या १० महिन्यांपासून गांधीवादी मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जाणूनबुजून भडकवून आणि आपापसात लढवण्याचा कट रचत आहे असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. हा कट इथेपर्यंतच मर्यादित नाही. तर जवान आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपवून देण्याचं षड्यंत्र रचलं आहे. कर्नालमध्ये हजारो शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला गेला. पण शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही, असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here