संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्र राज्यात जूनपर्यंत दडी मारून बसलेला पाऊस जुलैमध्ये राज्यातील बहुतांश भागात मुसळधार कोसळतोय. अशातच गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं असलं तरी पुढील ३ दिवस राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही भागात सूर्यदर्शन झाले होते. बऱ्याचशा नद्यांची पाणी पातळी आता घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुढचे तीन दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे, असं म्हणता येईल.
दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. मात्र, तो आता उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे चित्र आहे. याशिवाय राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.