संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
भारताचा स्टार खेळाडू व ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने पुन्हा एकदा उत्तुंग कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकतीच स्वित्झरलँडच्या ज्युरिख येथे ‘डायमंड लीग’ स्पर्धा पार पडली, यामध्ये भालाफेक खेळात नीरजने स्वतःच्या तसेच देशाच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. ‘डायमंड लीग ट्रॉफी’ जिंकणारा नीरज हा पहला भारतीय ठरला आहे, यामुळे त्याची ही कामगिरी ऐतेहासिक ठरली आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करत नीरजने अन्य दोन खेळाडूंचा पराभव करून अंतिम विजेतेपद आपल्या नावे केले.
नीरजने ८८.४४ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक करत झेक प्रजासत्ताकच्या याकूब वाडलेज व जर्मनीच्या जुलियन वेबर या दोन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. स्पर्धेत वाईट सुरुवात झाली असताना देखील अखेर नीरजने दमदार प्रदर्शन करत देशासाठी गौरवाची कामगिरी केली. या अगोदर ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने देशाचा अभिमान उंचावणारा विक्रम केला होता. आता ‘डायमंड लीग ट्रॉफी’ मिळवत नीरजने पुन्हा एकदा विदेशाच्या भूमीवर देशाचे नाव मोठे करणारा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे, त्यामुळे नक्कीच त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.