Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

माजी मंत्री अनिल परब यांचा ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अंतरिम जामीन मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांच्यावर दापोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीतील मुरुड इथे बांधलेल्या रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीशी संगनमत करून त्यांनी कर आकारणी करून शासन आणि ग्रामपंचायत यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दापोली पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी रूपा दिघे यांनी याबाबत पोलीसांत फिर्याद दिली असून अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुरेश तुपे आणि ग्रामसेवक अनंत कोळी हेदेखील सह आरोपी आहेत.

दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि आमदार अनिल परब यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ३४ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अनिल परब यांना आज अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. खेड सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परबांवर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होत आहे. २०१७ मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी २०१९ मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर २०२० मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालय) २६ मे रोजी अनिल परब यांच्या सात ठिकाणी छापेमारी केली. तसेच त्यांच्या साथीदारांच्या घरांवरही छापे टाकून चौकशी केली. दरम्यान परब यांनी जमीन खरेदीपासून ते बांधकामात अनियमितता केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र परब यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *