संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि वाद यांचे जणू अतूट नाते असल्याची स्थिती आहे, आजवर वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले राज्यपाल आता एका नव्या प्रकरणाने लक्ष्य बनण्याची लक्षणे दिसून येत आहे. प्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन मालिका ‘भाग्य लक्ष्मी’ फेम मायरा मिश्रा हिचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत राजभवनात काढण्यात आलेले फोटो खुद्द मॉडेलने ट्विटर अकाउंट वर शेअर केल्याने नव्याने वाद उफाळून आला आहे.
मायरा मिश्रा हिने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती यावेळी खुर्चीवर बसून तसेच राजभवन परिसरात विविध जागी तिने राज्यपालांसोबत फोटो काढले होते, हे सर्व फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने मनसेने यावर संतप्त प्रतिक्रिया देत आक्षेप घेतला आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी या फोटोंना शेअर करत ट्विटर पोस्ट द्वारे खडेबोल सुनावले आहे, ही बाई राजभवनात काय करत आहे ? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही असा प्रश्न मनसे नेत्याकडून उपस्थित केला गेला आहे.
दरम्यान हे ट्विट अधिक लोकांपर्यंत वेगाने पोहचत असल्याने अगोदरच शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यपालांविरोधात राज्याचे वातावरण तापले असताना त्यात नव्याने एका नव्या वादाची भर पडणार आहे. मनसेनंतर इतर काही विरोधी पक्ष राज्यपालांवर प्रश्नांची सरबत्ती करण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच कुठल्या ना कुठल्या मुद्द्याने आजवर राज्यपाल वादाचे कारण बनले आहे, मात्र यावेळी एका वेगळ्याच प्रकरणाने विरोधाचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.