Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश मनोरंजन महाराष्ट्र

ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते स्व. लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचे मिरा-भाईंदरमध्ये झाले भूमिपूजन

संगीताच्या प्रचार – प्रसाराचे मोलाचे कार्य गुरुकुल मधून होईल – उषा मंगेशकर

आमदार प्रताप सरनाईक यांचे कलेच्या प्रचारासाठीचे कार्य कौतुकास्पद ; आम्ही कायम त्यांच्यासोबत – उषा मंगेशकर

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरात ‘भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय’ (गुरुकुल) उभे राहणार आहे त्याचे आज भूमिपूजन झाले याचा खूप आनंद आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे संगीत गुरुकुल उभे राहत असून त्यांच्या चेहऱ्यावरील निश्चय पाहून आमची पूर्ण खात्री झाली आहे की हे संगीत गुरुकुल अतिशय चांगल्या पद्धतीने उभारले जाणार आहे. संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वाना सर्व भाषेतील संगीत शिकता यावे, सर्व प्रकारचे संगीत, वाद्य, गाण्याचे ज्ञान, संगीताचे विविध जे विभाग आहेत त्याचा प्रसार व्हावा अशी लता दीदींची इच्छा होती. आणि दीदींच्या इच्छेप्रमाणेच हे संगीत गुरुकुल येथे उभारले जात आहे याचा आनंद आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी हातात घेतलेले हे काम मीरा भाईंदर प्रमाणेच ठाण्यातही पूर्ण होईल व कलेच्या प्रचारासाठी ते करत असलेल्या कामात मंगेशकर कुटुंब त्यांच्या सोबत आहे, असे ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मीरारोड येथे बोलताना आज सांगितले.

मिरा-भाईंदर शहरात मोठ्या संख्येने कलाकार, कलाप्रेमी, संगीत प्रेमी, संगीत शिकू इच्छिणारे राहतात. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी त्यांच्या नावे मिरा-भाईंदर शहरात संगीत गुरुकुल उभारण्याची संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला मान्यता देत मीरा भाईंदर मध्ये संगीत गुरुकुल उभारण्यासाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. मिरारोड येथील आरक्षण क्रमांक २४६ येथे हे संगीत गुरुकुल उभारले जाणार असून आज त्याचे उषा मंगेशकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मिरा-भाईंदरचे हे संगीत गुरुकुल बांधून पूर्ण होईल तेव्हा त्यावर मंगेशकर कुटुंबीयांनी लक्ष ठेवावे व मिरा-भाईंदरच्या संगीत विद्यालयात शिकायला येणाऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा भाषणात आमदार सरनाईक यांनी व्यक्त केली. त्यावर उषा मंगेशकर म्हणाल्या की, आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमदार सरनाईक हे गाण्याकरिता किंवा कलेच्या प्रचारासाठी ताठ उभे आहेत आणि ते चांगले काम सतत करतील याच्यावर माझा विश्वास आहे. मंगेशकर कुटुंबाला त्यांनी विनंती केली आहे की मिरा-भाईंदरचे हे संगीत विद्यालय गुरुकुल मंगेशकर कुटुंबाने चालवावे. त्यांच्या या आज्ञेचा मी स्वीकार करते. आमदार सरनाईक यांना वचन देते कि आम्ही नक्की हे कार्य (मीरा भाईंदर संगीत गुरुकुल चालविण्याचे) फार चांगल्या रीतीने पार पाडू. मिरा-भाईंदर मध्ये संगीत गुरुकुल उभे राहत आहे याचा खूप आनंद होत असून आमदार प्रताप सरनाईक यांची मी खूप आभारी आहे असेही उषा मंगेशकर म्हणाल्या. आमदार सरनाईक मिरा-भाईंदरप्रमाणेच ठाण्यातही असे संगीत गुरुकुल उभारणार आहेत. ते जिथे जिथे हे कार्य हातात घेतील ते नक्कीच पूर्ण करतील याची खात्री आहे आणि आम्ही सरनाईक यांच्या सोबत आहोत. केव्हाही त्यांनी बोलवावे आम्ही मंगेशकर कुटुंबीय येऊ. जिथे जिथे ते बोलवतात तिथे तिथे आम्ही त्यांच्यासह येऊ. सर्व मंगेशकर कुटुंब प्रताप सरनाईक यांच्या बरोबर आहे असेही उषा मंगेशकर म्हणाल्या व त्यांनी आमदार सरनाईक यांचे कौतुक केले.

संगीत गुरुकुल मध्ये काय काय?

मिरा रोडच्या आरक्षण क्रमांक २४६ येथे हे संगीत विद्यालय उभे राहणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात २१ कोटींचा खर्च होणार आहे. तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ २३९३. चौ. मी. एवढे आहे. या इमारतीच्या कामात म्यूजिकल लायब्ररी , म्युझिकल क्लास रूम , म्युझिकल प्रॅक्टिस व डबिंग रूम असेल. तसेच लॅण्ड स्केपिंग, संगीत विद्यालयाचे आकर्षक प्रवेशद्वार, पार्किंग सुविधा, म्युरल, लिफ्ट व इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. मिरा-भाईंदरचे हे संगीत विद्यालय राज्य सरकारच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करण्यात येईल, असे आमदार सरनाईक म्हणाले. मिरा-भाईंदर शहरात संगीतावर प्रेम करणारे खूप प्रेमी, रसिक असंख्य आहेत. अनेकांना संगीत शिकून या क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यांना या संगीत विद्यालयामुळे संधी मिळेल. मिरा-भाईंदरच्या या संगीत विद्यालयातून अनेक मोठे संगीतकार, कलाकार घडावेत अशी माझी इच्छा आहे, असे आमदार सरनाईक म्हणाले. मिरा-भाईंदरचे संगीत गुरुकुल राज्य सरकारच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न झाले कि मिरा-भाईंदरच्या विद्यालयात संगीत अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना येथेच पदवी सुद्धा मिळू शकेल असेही आमदार सरनाईक म्हणाले.

या भूमिपूजन सोहळ्याला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह महापालिका आयुक्त संजय काटकर, आमदार गीता जैन, संगीतकार मयुरेश पै, पालिकेचे इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘लतायुग’ संगीत सोहळ्याला रसिकांची दाद

या भूमिपूजनाचे औचित्य साधून जीवनगाणी निर्मित ‘लतायुग’ या कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या गाजलेल्या हिंदी – मराठी गीतांची मैफिल सकाळी १० वाजल्यापासून रंगली. संपूर्ण नाट्यगृह खचाखच भरले होते. कला रसिकांनी या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद दिला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *