गुन्हे जगत

रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित ‘देशीदारु’ ची तस्करी करणार्‍या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना काळात गेल्या वर्षभरापासून जगाला विळखा घालणार्‍या कोविड नावाच्या महामारीने कोट्यावधी लोकांना जायबंदी करीत लाखोंचे जीवही घेतले आहेत. आजही या महामारीच्या झपाट्यात येवून अनेकांना रुग्णालयात जागा नसूनही प्रतीक्षेत राहून दाखल व्हावे लागत आहे. वर्षभरापासून सुरु असलेल्या या भयानक प्रकाराने जगातील माणूसकीचेही दर्शन घडले आणि अमानुषतेचेही. या संपूर्ण काळात आरोग्य यंत्रणांनी केलेल्या कामाला तोडच नाही. मात्र अलिकडच्या काळातील काही घटनांनी या क्षेत्रातही अमानवी प्रवृत्तींचा शिरकाव झाल्याचे दाखले मिळत असतांनाच चक्क आता रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित दारु तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी एका रुग्णवाहिकेसह दोघांना ताब्यात घेतले असून जवळपास पाच खोके देशी बनावटीच्या दारुसह २ लाख २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सध्या जिल्ह्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी जागोजागी तपासणी नाके उभारले आहेत. त्याद्वारे मास्क नसलेल्या, कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासह संशयास्पदरित्या हालचाली असलेल्या वाहनांची कसून तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार बसस्थानकाजवळील तपासणी नाक्यावर आज सकाळपासूनच पोलिसांकडून नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी तेथे पोलिसांनी अडवलेल्या वाहनांची गर्दीही झाल्याचे चित्र होते. अशातच नाशिककडील रस्त्याच्या बाजूने भरधाव वेगाने सायरन वाजवत एक रुग्णवाहिका आली. या रस्त्याला रुग्णवाहिका तशी नवीन नाही. मात्र दूरवरुन सायरनचा आवाज आला नाही, मात्र सदरचे वाहन दृष्टीपथात येताच सायरन का वाजला ? असा प्रश्‍न यावेळी तपासणी नाक्यावर उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पडला.

त्यामुळे सदरची रुग्णवाहिका तपासणी नाक्यावर पोहोचण्या आधीपासूनच त्याकडे त्यांचे लक्ष खिळले. सदरचे वाहन सायरन वाजवित भरधाव वेगाने तपासणी नाक्याजवळ येताच पो.नि.देशमुख यांनी रुग्णवाहिकेच्या मागील भागावर लक्ष्य केंद्रीत केले असता मागील बाजूस कोणीही रुग्ण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरुन त्यांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे आपण पकडले जातो की काय या भितीने चालकाने नाक्यापासून काही अंतरावर पुढे जात नवीन नगर रस्त्यावर आपली रुग्णवाहिका उभी केली व तो पोलिसांकडे चालत गेला. यावेळी पोलिसांनी रुग्ण नसतांना सायरन का वाजवतोय? असा सवाल केल्यानंतर तो काहीसा गोंधळला आणि येथेच पो.नि.देशमुख यांनी त्याला हेरला.

त्याच्या रुग्णवाहिकेची तपासणी करण्याचा आदेश मिळताच नाक्यावरील चौघांनी त्या वाहनाकडे धाव घेत त्याचा दरवाजा उघडताच पोलिसांनीही तोंडात बोट घातले. मारुती ओमनी कंपनीच्या या वाहनात ज्या ठिकाणी रुग्ण ठेवला जातो त्या संपूर्ण भागात पद्धतशीरपणे थोडी नसून तब्बल पाच खोके देशी दारु पोलिसांना आढळली. याबाबत त्याच्यासह वाहनात बसलेल्या त्या जोडीदाराकडे चौकशी केली असता ते उडवाउडवी करु लागल्याने त्या दोघांनाही ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

यावेळी सदरच्या रुग्णवाहिकेतून तब्बल २३ हजार रुपये किंमतीची देशी बनावटीची दारु जप्त करीत पोलिसांनी चालक विजय खंडू फड (वय ४२, रा.साईदर्शन कॉलनी, मालदाड रोड) व त्याचा साथीदार कैलास छबुराव नागरे (वय ४९, रा.शेडगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. सदरची देशीदारु शेडगाव येथे घेवून जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. या कारवाईत पो.नि.देशमुख यांच्यासह पो.कॉ.सचिन उगले, प्रमोद गाडेकर व सलिम शेख यांचा सहभाग होता.

गेल्या वर्षभराच्या काळात तालुक्यातील असंख्य रुग्णवाहिका चालकांनी मानवतेची सर्वोच्च सेवा बजावली आहे, आजही ही मंडळी दिवसरात्र रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आपले जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावित आहेत. मात्र या क्षेत्रातही वेगळ्या प्रवृत्तीच्या माणसांचा शिरकाव झाल्याचे आजच्या घटनेतून समोर आले असून रुग्ण असल्याचा बनाव करुन चक्क रुग्णवाहिकेतून दारु वाहण्याचे बेकायदा उद्योग सुरु आहेत. या प्रकाराने पोलिसांचीही जबाबदारी वाढली असून अशा मोजक्या प्रवृत्तींमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या अन्य रुग्णवाहिकांच्या चालकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *