Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

अनंत चतुर्दशी दिनी डोंबिवलीत झाले ३ हजार ९५१ गणपतींचे विसर्जन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीत काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील ६६ सार्वजनिक मंडळांचे आणि ३ हजार ८८५ घरगुती अशा एकूण ३ हजार ९५१ गणपती बाप्पांचे विसर्जन “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात मोठ्या दिमाखात करण्यात आले.

शहरातील खाडी किनारी भोपर, कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखानपाडा तसेच काही कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणपती विसर्जन करण्यात आले. संध्याकाळी पावसाने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण जरी घातले असले तरीही विसर्जन सोहळा कोणत्याही व्यत्ययाशिवाय शांततेत आणि उत्साहात पार पडला. दरम्यान मोठागाव येथे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजेश मोरे, प्रकाश भोईर, यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित होते. तर कोपर येथे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पावशे, तर जुनी येथे जुनी डोंबिवली ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी, भाजपाचे कृष्णा पाटील आदींनी यावेळी आपली उपस्थिती दर्शावत विशेष सहकार्य केले.

विसर्जनाच्या वेळी वाहतूककोंडी होवून वाहतुकीला अडथळा होऊ नये व विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासन, वाहतूक यंत्रणा आणि शहर पोलीस यंत्रणा तत्परतेने सज्ज होती. शहरातील गणेशघाट विसर्जनासाठी सुसज्ज असले तरी देखील ऑन कॉल विसर्जन, कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी आदि उपक्रमांना यावेळी चांगलाच प्रतिसाद लाभला होता.

डोंबिवलीत जुनी डोंबिवली, कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली यासह अन्य गणेशघाट विसर्जनस्थळांसह शहर आणि ग्रामीण भागातील तलाव अशा एकूण २३ ठिकाणी पालिका प्रशासन आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली, जुनी डोंबिवली गणेशघाट अशा मोठ्या विसर्जन ठिकाणी इंजिन रबर बोट व्यवस्था होती. विसर्जन स्थळांच्या ठिकाणी जनरेटर, हॅलोजन्स टॉवर आणि सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे देखील लावले गेले होते.

विसर्जन स्थळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सुसज्ज होती. पोलीस अधिकारी, होमगार्ड, एसआरपीच्या तुकडया विसर्जना दरम्यान ठिकठिकाणी तैनात केल्या गेल्या होत्या. यावेळी अवजड वाहनांना विसर्जन परिसरात बंदी घालण्यात आली होती.

डोंबिवली शहरात काही ठीकाणी वाहतूकीत बदल करण्यात आला होता. दरम्यान यावेळी वाहनचालक व गणेशभक्तांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस
सातत्याने करीत होते. डोंबिवली पश्चिम मधील मोठागाव येथील गणेश घाटावर विसर्जन दरम्यान माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे फाउंडेशन आणि स्वामी नारायण गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीत थकलेल्या गणेशभक्तांना मोफत दहा हजार वडा-पाव व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

‘निर्मल युथ फाउंडेशन’ तर्फे निर्माल्य पुनर्वापर प्रकल्प राबवण्याकरिता फाउंडेशन चे युवा स्वयंसेवक सर्व गणेश भक्तांना हार व फुले त्यांच्याकडे जमा करण्यासाठी सतत आवाहन करीत होते.

 

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *